नवी दिल्ली - बिहारमध्ये मतदारांनी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला सलग चौथ्यांदा पसंती दर्शवली असली तरी 20 वर्षांनंतर प्रथमच भाजपाबिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती (Uma Bharti) यांनी बिहार विधानसभा निवडणुका (Bihar Election) आणि मध्यप्रदेशात (MP Bypolls) पार पडलेल्या पोटनिवडणुकांवर आपली प्रतिक्रिया दिली. तेजस्वी यादव यांची स्तूती केली आहे.
तेजस्वी यादव एक चांगले व्यक्ती आहेत. ते बिहारचं नेतृत्व करू शकतात. मात्र थोडं मोठं झाल्यानंतर. त्यांच्याकडे राज्य चालवण्याचा कोणताही अनुभव नाही असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांची देखील स्तुती केली. त्यांनी ही निवडणूक खूप अत्यंत हुशारीनं लढली असं म्हटलं आहे. बुधवारी त्यांनी निवडणुकांच्या निकालांवर भाष्य केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
"तेजस्वी यादव हे एक चांगले व्यक्ती आहेत. मात्र सध्या ते राज्य चालवण्यास सक्षम नाहीत. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा बिहारला जंगलराजमध्ये ढकललं असतं. तेजस्वी यादव हे नेतृत्व करू शकतात. पण थोडं मोठं झाल्यानंतर" असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. यासोबतच "कमलनाथ यांनी ही निवडणूक चांगल्याप्रकारे लढली. परंतु त्यांनी जर आपलं सरकार योग्यरितीनं चालवलं असतं तर आज या ठिकाणी इतक्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांनी ही निवडणूक खूप अत्यंत हुशारीनं लढली" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"बिहारच्या जनतेने विकास हवा असून जंगलराज नकोय हे दाखवून दिलं"
बिहार व अन्य राज्यांत भाजपाने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजपा यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. "बिहारच्या जनतेने त्यांना विकास हवा असून जंगलराज नको आहे हे दाखवून दिलं. तसेच देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकींमध्येही भाजपाने मोठे यश मिळवले आहे. बिहारबरोबरच या राज्यांमध्ये जनतेने भाजपाला दिलेला कौल हा मोदींवरील विश्वासाचे प्रतिक आहे" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं"
निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. "बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो" असं म्हटलं आहे. तसेच बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली असं देखील शहा यांनी म्हटलं आहे. "बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारमधील सर्वांचे आभार मानतो. मुख्यत: बिहारचे तरूण आणि महिलांना धन्यवाद देतो ज्यांनी बिहारची सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एनडीएला बहुमत मिळवून दिलं" असं ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.