Bihar Elections 2020 : "आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:22 PM2020-10-14T13:22:33+5:302020-10-14T13:36:17+5:30
Bihar Elections 2020 : केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.
नवी दिल्ली - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. याच दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. नित्यानंद राय यांनी बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) विजय झाल्यास दहशतवादी काश्मीरमधून बिहारमध्ये आश्रय घेतील अशी भीती व्यक्त केली आहे. नित्यानंद राय यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
वैशाली जिल्हातील महनारमध्ये एका प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लोकांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. "बिहारमध्ये आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील" असं नित्यानंद राय यांनी म्हटलं आहे. राय यांच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आरजेडी प्रवक्ता अन्वर हुसैन यांनी भाजपा नेते भीतीपोटी अशी वक्तव्यं करत असल्याची टीका केली आहे.
#WATCH | Terrorists will escape Kashmir and take shelter in Bihar if RJD (Rashtriya Janata Dal) is elected to power in the state: Minister of State for Home, Nityanand Rai at an election rally in Vaishali, Bihar #BiharElections2020pic.twitter.com/pS91Mnrrx2
— ANI (@ANI) October 13, 2020
नित्यानंद राय यांच्यावर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी
भाजपाने मात्र नित्यानंद राय यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. काँग्रेस नेता संतोष कुमार यांनी नित्यानंद राय यांच्यावर कारवाई करण्याची तसेच राय यांना प्रचारसभेपासून दूर ठेवलं पाहिजे अशी मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बिहार विधानसभेला काही कालावधी शिल्लक असला तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार मैदानात उतरले आहेत. कन्हैया कुमार यांनी आपला गृहजिल्हा बेगूसराय येथून आपल्या निवडणूक अभियानाची सुरुवात केली आहे.
"मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपात प्रवेश करेन"
कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. तसेच "मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन", असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. कन्हैया कुमार हे सोमवारी बगूसराय जिल्हयातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचे नामांकन भरताना उपस्थित होते. नामांकनानंतर कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भाजपावर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपाचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत असं देखील कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर जोरदार Video व्हायरल
"ज्योतिरादित्य शिंदे हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हा पासून ते भाजपाचे झाले. मी एके ठिकाणी बोललो आहे की मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल... तर मी बोलेन की खबरदार... जर जास्तच बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन. ज्यांना हे शिव्या देतात ते 5 मिनिटानंतर काका म्हणायला सुरुवात करतात" असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.