बिहार पोलिसांच्या प्रमुख पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या गुप्तेश्वर पांडे आता निरुपणकाराच्या भूमिकेत दिसून येत आहेत. काही वर्षातच विविध रूप धारण करून बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा राजकारणातील रस निघून गेला. माझ्यात यशस्वी राजकीय नेता बनण्याची क्षमता नाही असं ते म्हणतात. त्याचसोबत असा डीजीपी पाहिला नाही ज्यानं आमदारकीसाठी राजीनामा दिला असं म्हणत गुप्तेश्वर पांडे खंत व्यक्त करत आहेत.
गुप्तेश्वर पांडे म्हणतात की, माझ्याकडे राजकीय नेता बनण्याची क्षमता नाही. जर तसं असतं तर कधीच नेता बनलो असतो. मला आमदार व्हायचं होतं कारण गरीब लोकांची सेवा करायचं होतं. आता मी केवळ देवाची पूजा करणार आहे. माणूस हा सुखांच्या मागे लागतो परंतु खरं सुख देवात आहेत. मला देवाची सेवा करण्याची इच्छा आहे. एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलता. मी अपवाद नाही. माझ्यातील हे परिवर्तन अचानक झालं नाही असं त्यांनी सांगितले.
बिहार निवडणुकीपूर्वी जेडीयूत सहभागी झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांना विधानसभेचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव कुठेही आलं नाही. त्यानंतर त्यांनी थेट नेतृत्वावर निशाणा साधत फेसबुक पोस्ट लिहिली आणि म्हटलं की, काही बाब नाही, माझ्या आयुष्यात संघर्ष लिहिला आहे. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे राजकारणात सक्रीय झाले नाहीत. अनेक दिवस ते अज्ञातवासात होते. सध्या ते वेगळ्या वेशभूषेत सगळ्यांना दिसत आहेत. २००९ मध्ये गुप्तेश्वर पांडे यांनी नोकरी सोडली होती. त्यानंतर भाजपामधून निवडणूक लढवली. हरल्यानंतर ते पुन्हा नोकरीत आले. नितीश सरकारने त्यांना पुन्हा नोकरीत घेऊन बिहारचे डीजीपी बनवलं होतं.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्येवरून देशभरात चर्चेत
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते. बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नसल्याने आता पांडे यांचं काय होणार याची चर्चा रंगली होती. गुप्तेश्वर पांडे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. बिहारचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ २८ फ्रेबुवारी २०२१ पर्यंत होता. मात्र, त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता.