पटना : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारचे उद्योगमंत्री श्याम रजक उद्या म्हणजेच सोमवारी (दि.१७) आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजीनामा दिल्यानंतर श्याम रजक हे जनता दल संयुक्त (जेडीयू) पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रीय जनता दलामध्ये (आरजेडी) प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, १७ ऑगस्टला ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत, हे निश्चित मानले जात आहे.
श्याम रजक आरजेडीमध्ये प्रवेश करतील, असे पूर्वीपासूनच तर्कवितर्क सुरु आहेत. मात्र, अद्याप याबद्दल अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही. श्याम रजक यांची नाराजी आणि आरजेडीमध्ये प्रवेश हा बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी जेडीयूला मोठा धक्का मानला जात आहे.
एकेकाळी श्याम रजक हे लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जात होते. तसेच, श्याम रजक हे बिहारमधील राबड़ी देवी सरकारमध्ये मंत्रीही होते. दरम्यान, जेडीयूमध्ये श्याम रजक यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बरेच प्रयत्न करूनही परिस्थिती बदलली नाही, तेव्हा त्यांनी आरजेडीमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
श्याम रजक यांनी २००९ मध्ये आरजेडीला रामराम ठोकून जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. जेडीयूच्या तिकिटावर विधानसभा निवडणुका लढवल्या आणि मंत्री झाले. सध्या बिहारमधील महत्वाचा दलित चेहरा म्हणून ओळखले जाणारे श्याम रजक पुन्हा आरजेडीमध्ये परतणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच, श्याम रजक यांचे आरजेडीत पुनरागमन हे जातीय समीकरणाच्या बाबतीत नितीश कुमारांच्या जेडीयूला मोठा धक्का मानला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरूच आहे. यातच आता श्याम रजक यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे सध्या बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे.