"बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार, निम्याहून अधिक आमदार पक्ष सोडणार", काँग्रेस नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 11:20 AM2021-01-06T11:20:15+5:302021-01-06T11:23:43+5:30
bihar politics : काँग्रेसच्या हायकंमाडने भरत सिंह यांचा दावा फेटाळून लावला आहे.
पटना : बिहारच्याराजकारणात नवा भूकंप आला आहे. जवळपास ११ काँग्रेसचे आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा, येथील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. पक्षामध्ये लवकरच मोठी फूट पडणार असून ११ आमदार पक्ष सोडणार आहे, असे भरत सिंह यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेसच्या हायकंमाडने भरत सिंह यांचा दावा फेटाळून लावला आहे.
१९ आमदारांपैकी ११ आमदार असे आहेत की, जे काँग्रेस पक्षाचे नाहीत. मात्र, निवडणुका जिंकल्या आहेत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट खरेदी केले आणि आता आमदार बनले आहेत. संख्याबळाने स्वत:ला मजबूत करण्यासाठी एनडीएमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेस विधीमंडळाचे नेते अजित शर्मा सुद्धा अशा लोकांमध्ये सामील आहेत, जे पक्षात फूट पाडू पाहत आहेत, असे काँग्रेस नेते भरत सिंह यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, जे ११ काँग्रेस आमदार पक्ष सोडणार आहेत. त्यांचे मार्गदर्शक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह आणि वरिष्ठ काँग्रेस नेते सदानंद सिंह हे आहेत. राज्यपाल नियुक्त आमदारांचे नामाकंन अद्याप बाकी आहे. त्यामुळे सदानंद सिंह आणि मदन मोहन झा हे राज्यपाल कोठ्यातून आमदार होण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप भरत सिंह यांनी केला. तसेच, सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या आरजेडीसोबत असलेल्या महाआघाडीला विरोध केला आहे. अनेक वर्षांपासून मी आरजेडीसोबतच्या महाआघाडीचा विरोध केला आहे, असे भरत सिंह म्हणाले.
दरम्यान, याआधी बिहारच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती बिहारमधील काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांनी काँग्रेसच्या हायकमांडकडे केली होती. यानंतर काँग्रेस हायकमांडने शक्ती सिंग गोहिल यांना बिहारच्या प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त केले होते.पक्षाने जारी केलेल्या पत्रानुसार, भक्तम चरण दास यांना शक्ती सिंह गोहिल जागी बिहारचे काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.