नवी दिल्ली - बिहारमधील मुजफ्फरपूर आणि जवळच्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे १५० हून अधिक लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला. या मुद्दावरून राज्य सरकारची भूमिका आणि विरोधात असलेल्या तेजस्वी यादव यांचे मौन बिहारच्या जनतेला खटकत आहे. राज्यातील विरोधकांनी केलेल्या दुर्लक्षाचा पार्श्वभूमीवर मुजफ्फरपूरमध्ये बॅनर लागले असून त्यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना शोधून देणाऱ्याला बक्षीस ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांची माहिती देणाऱ्याला ५१०० रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तेजस्वी बिहारमध्ये विरोधीपक्ष नेते आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते गायब आहेत. त्यातच बिहारमध्ये आरोग्य संकट आले असून १५० हून अधिक चिरमुड्यांना मेंदुज्वरामुळे जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान राजद नेते रघुवंश प्रसाद सिंह यांना तेजस्वी यादव यांच्याविषयी विचारण्यात आले तेव्हा, ते म्हणाले आपल्याला तेजस्वी यांचा पत्ता माहित नाही. कदाचित, तेजस्वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी गेले असतील, पण मी हे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, असंही रघुवंश म्हणाले. दुसरीकडे तेजस्वी यादव यांचे ट्विटर अकाउंट पाहिल्यास त्यांचे शेवटचे ट्विट ११ जूनचे आहे. त्यामध्ये त्यांनी पिता लालू प्रसाद यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर देखील तेजस्वी यादव यांचा शोध घेण्यात येत आहे.