पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकाला कल एनडीए बाजूने असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र अद्यापही १२३ जागांवर चुरशीची लढाई सुरु आहे. याठिकाणी मतांमधील फरत केवळ ३ हजारांचा आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत बिहारमध्ये निकालांबाबत उत्सुकता कायम राहणार आहे. यात काँग्रेस नेते उदित राज यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे.
बिहार निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असणारी प्लूरल्स पार्टीच्या प्रमुख पुष्पम प्रिया चौधरी यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. बिहारच्या दोन मतदारसंघात पुष्पम प्रिया नशीब आजमवत आहेत. पाटणाच्या बांकीपूर आणि बिस्फी या दोन्ही मतदारसंघात पुष्पम प्रिया यांनी जोरदार प्रचार केला होता, याठिकाणी स्थानिक वृत्तपत्रामध्ये पुष्पम प्रिया यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं, मात्र या दोन्ही मतदारसंघात पुष्पम प्रिया या पिछाडीवर आहेत.
याचदरम्यान पुष्पम प्रिया चौधरी यांनी ट्विट करून भाजपावर आरोप केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, बिहारच्या निवडणुकीत EVM हॅक करण्यात आले आहे, आणि प्लूरल्स पार्टीचे मतदान भाजपाने आपल्याकडे वळवले आहेत. बांकीपूर मतदारसंघातून पुष्पम प्रिया यांच्याविरोधात काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हा आणि भाजपाकडून तीनदा आमदार असलेले नितीन नवीन रिंगणात होते, नितीन नवीन यांचे वडील किशोर सिन्हा हेदेखील अनेकदा या मतदारसंघात आमदार होते.
पुष्पम प्रिया या जेडीयूचे माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी आहे. याप्रकारे तिन्ही नेते स्वत:च्या वडिलांचा वारसा वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुष्पम प्रियाने बांकीपूर जागेवरून नितीश कुमारपासून तेजस्वी यादव यांच्यापर्यंत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून या मतदारसंघातून निवडणुकीत उभं राहण्याचं आव्हान दिलं होतं. या मतदारसंघात भाजपा उमेदवार नितीन नवीन आघाडीवर आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर लव सिन्हा आहेत.
तर मधुबनी जिल्ह्यातील बिस्फी जागेवरूनही पुष्पम प्रिया चौधरी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात आरजेडीचे फैयाद अहमद आणि भाजपाचे हरिभूषण ठाकूर निवडणुकीत उभे आहेत. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडीचे फैयाद अहमद सलग दुसऱ्यांदा निवडणुकीत जिंकले होते ते यंदा हॅट्रीक करण्याच्या उद्देशाने निवडणुकीत उभे आहेत. पुष्पम प्रिया या मतदारसंघात उभ्या राहिल्याने ही जागा हायप्रोफाईल मानली जात आहे. याठिकाणी सध्या आरजेडीचे उमेदवार आघाडीवर आहेत तर पुष्पम प्रिया तिसऱ्या नंबरवर आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत पुष्पम प्रिया चौधरी यांच्यावर फक्त राज्यात नाही देशभरात चर्चा होती. मूळची दरभंगा येथे राहणारी पुष्पम लंडनच्या प्रसिद्ध स्कूल ऑफ इकॉनोमिक्समधून मास्टर्सची डिग्री घेतली आहे. लंडन रिटर्न बिहारच्या राजकीय मैदानात उतरली होती. एकेकाळी पुष्पमचे वडील जेडीयूमध्ये होते, मात्र या निवडणुकीत पुष्पमने वेगळा पक्ष काढत राजकीय आखाड्यात उतरली. पुष्पम प्रियाने पहिल्याच निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेच्या सामाजिक कार्यकर्त्यांना, शिक्षक, डॉक्टर्स आणि अन्य व्यावसायिकांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला. पुष्पमने मार्चनंतर बांकीपूर येथील गावांचा दौरा केला, स्थानिकांच्या भेटीगाठी केल्या होत्या.