पटणा – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत, यात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. परंतु महाआघाडीकडून मतमोजणीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान आता जेडीयू खासदारावर गंभीर आरोप लागले आहेत. यात बिहारच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने जिल्ह्याच्या डीएमना चौकशीसाठी पत्र लिहिलं आहे.
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी हे पत्र बिहारचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बालामुरूगन यांनी लिहिलं आहे. या पत्रात गोपाळगंज जिल्ह्याचे डीएमसह जिल्हा निवडणूक अधिकारी अरशद अजीज यांच्याकडे १२ नोव्हेंबरपर्यंत भोरे विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले आहे. या पत्रात १० नोव्हेंबरला सीपीआयने दिलेल्या निवेदनाचाही हवाला देण्यात आला आहे. सीपीआयच्या आरोपानुसार १० नोव्हेंबर दिवशी जेडीयू खासदार आलोक कुमार सुमन बळजबरीने मतमोजणी केंद्रात घुसले आणि नियमांचे उल्लंघन केले. या मतदारसंघात पुन्हा मतमोजणी घेण्यात यावी अशी मागणी केली.
जेडीयूचे खासदार आलोक कुमार सुमन ((JDU MP Alok Kumar Suman) यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बालामुरूगन डी यांनी गोपाळगंजचे डीएम अरशद अजीज यांना विभागीय पत्र लिहून या प्रकरणाचा अहवालासोबत भोरे विधानसभा मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास सांगितले आहे.
गोपाळगंजचे जेडीयूचे खासदार आलोक कुमार सुमन यांनीही त्यांच्यावरील आरोपानंतर स्पष्टीकरण दिल आहे. खासदारांच्या मते 'ते लोकांद्वारे निवडलेले एक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे संवैधानिक पद आहे, ज्याला प्रतिष्ठा आहे. त्याचा एक नियम आहे, ज्या अंतर्गत काम करावे लागते. त्यांना हे चांगले ठाऊक आहे की लोकप्रतिनिधीला कोणत्याही मोजणीच्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिल्ह्यात सर्व केंद्रे सीसीटीव्हीने सुसज्ज होती. निवडणूक आयोगाने हे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजेत आणि निराधार आरोप करणार्यांवरही कारवाई केली पाहिजे. षडयंत्रांतर्गत विरोधकांनी असं घाणेरडे राजकारण केले आहे जे कोणत्याही परिस्थितीत चांगले नाही असं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावला आहे.
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांना महाआघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले आहे. या दरम्यान तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारची जनता आमच्या पाठीशी आहे. आमचा हरलो नाही तर हरवलं गेलं आहे. टपाल मतपत्रिकेची पुन्हा मोजणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते म्हणाले की, जनमत महाआघाडीच्या बाजूने होते, तिथे निवडणूक आयोगाचा निकाल एनडीएच्या बाजूने होता. हे पहिल्यांदा झालं नाही. २०१५ मध्ये जेव्हा महाआघाडी बनली, आमच्या बाजूने लोकांनी मतदान केले, तेव्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने मागच्या दाराने प्रवेश केला.
तेजस्वी यादव म्हणाले की, सर्व उमेदवारांच्या शंका दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पुन्हा मतमोजणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच, रेकॉर्डिंग आम्हाला दाखवायला हवी. २०१५ मध्येही नितीशकुमार यांनी जनादेशाचा अपमान केला होता. नितीशकुमारांना खुर्ची आवडते, हे कटकारस्थानाने खुर्ची मिळवतात. आमचा रोजगाराचा मुद्दा जनतेने स्वीकारला. आम्ही जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही हरलो नाही आणि आम्ही धन्यवाद यात्रा काढणार, लोकांना धन्यवाद देणार असं तेजस्वी यादव म्हणाले.