पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भलेही एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी पटणा येथे माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित करताना बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार बनेल असा दावा केल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
याबाबत तेजस्वी यादवांनी आमदारांना सूचना केल्या की, पुढील महिनाभर तुम्ही सगळ्यांनी पटणामध्येच राहा. महाआघाडीतील काँग्रेसचे काही आमदार फुटण्याची भीती तेजस्वी यादव यांना आहे. त्यामुळे तेजस्वी यादव पूर्णपणे सतर्क राहत आहेत. या बैठकीत महाआघाडीचा नेता म्हणून तेजस्वी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारमध्ये राजद पाठोपाठ भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या आहेत आणि जदयूला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यातच भाजपातील काही नेते मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहेत, त्यामुळे एनडीएत काही आलबेल नसल्याने महाआघाडीला अद्यापही आशा कायम आहे.
मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार? याकडे महाआघाडीचे लक्ष आहे. त्यामुळे एनडीए जर काही बिनसलं तर महाआघाडी त्याचा फायदा घेत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या बैठकीत तेजस्वी यादव म्हणाले की, जनतेने महाआघाडीला समर्थन दिलं आहे. आपल्याला जवळपास १३० जागा मिळाल्या असत्या. पण नितीश कुमार यांनी विश्वासघातकी सरकार बनवलं आहे. अनेक ठिकाणी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप तेजस्वीने केला आहे.
बिहारमध्ये महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत, त्यात राजदने ७५ जागा जिंकल्या आहेत. राजदकडून सरकारवर उमेदवारांना हरवण्याचा आरोप करण्यात येत आहे. डाव्यांना १६ जागा मिळाल्या असून महाआघाडीतील काँग्रेसच्या कामगिरीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खुद्द काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी काँग्रेसमुळे महाआघाडीचा विजय झाला नाही हे सत्य पक्षाने स्वीकारलं पाहिजं असं म्हटलंय. तर काँग्रेसचा स्ट्राइक रेट खूप कमी राहिला, जर या जागा डावे आणि राजदा मिळाल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता अशीही चर्चा बैठकीत झाली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवून अवघ्या १९ जागांवर विजय मिळवला आहे.