नवी दिल्ली – बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. बिहार निवडणुकीत ७० जागा लढवून काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर समाधान मानावं लागलं. आरजेडी आणि काँग्रेस महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी खराब राहिल्याने महाआघाडीला बहुमतापासून दूर राहावं लागलं. काँग्रेसच्या या पराभवामुळे पक्षाच्या नेतृत्वावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
याबाबत कपिल सिब्बल म्हणाले की, काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटनेसारखा झाला आहे. बिहार निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल अद्याप कोणताही विचार झालेला नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल की, सगळं काही ठीक आहे आणि ही सामान्य घटना आहे असं सिब्बल यांनी सांगितले.
इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कपिल सिब्बल यांनी हे उत्तर दिलं. तसेच मी फक्त माझं वैयक्तिक मत मांडत आहे. मी नेतृत्वाला याबद्दल काही बोलताना ऐकलं नाही. माझ्याकडे नेतृत्वाबद्दल लोकांचा आवाज पोहचतो, मला फक्त तेवढचं माहिती असते. सिब्बल यांच्यापूर्वी बिहार काँग्रेसमधील मोठे नेते तारिक अन्वर यांनीही पक्षातंर्गत नेतृत्वाबद्दल भाष्य केलं होतं. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात विचार विनिमय होणं गरजेचे आहे, तर दुसरीकडे महाआघाडीच्या पराभवात आरजेडी आणि डावे पक्ष काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधत आहेत.
विचारमंथन करणार कसं?
बिहारमधील आमचे सहकारी तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये निकालाबद्दल विचारमंथन होणं गरजेचे आहे असं म्हटलं. जर गेल्या ६ वर्षात काँग्रेसने विचारमंथन केले नाही तर आता ती अपेक्षा कशी करू शकतो? आम्हाला काँग्रेसची कमतरता माहिती आहे. आम्हाला पक्षातंर्गत काय समस्या आहेत ते माहिती आहे. याचं समाधान काय असेल याचीही सगळ्या नेत्यांना जाणीव आहे. काँग्रेस पक्षालाही माहिती आहे. पण समस्येचा समाधान सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, जर काँग्रेसने आता विचार केला नाही तर पक्षाची घसरण अशीच सुरु राहिल. काँग्रेसच्या या स्थितीमुळे आम्ही सगळे चिंतेत आहोत असंही कपिल सिब्बल म्हणाले. त्याचसोबत काँग्रेस कार्यकारणीत समितीत संविधानानुसार लोकशाही पद्धत अवलंबली पाहिजे असंही त्यांनी सांगितले.
पक्षाच्या सुधारणेसंदर्भातील उपायांबद्दल कॉंग्रेस नेते सिब्बल म्हणाले, सर्वप्रथम आपल्याला संवादाची प्रक्रिया सुरू करावी लागेल. आम्हाला युतीची गरज आहे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचीही गरज आहे. जनता आमच्याकडे येईल याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. आमच्याकडे आता पूर्वीसारखी ताकद नाही. ज्यांना राजकीय अनुभव आहे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. परंतु या सुधारणेसाठी पहिल्यांदा विचारमंथन आवश्यक आहे.
सक्षम नेतृत्वाची गरज
आम्हाला अनेक स्तरांवर अनेक गोष्टी कराव्या लागतील. पक्षाच्या पातळीवर, पक्षाची भूमिका माध्यमात ठेवण्यापर्यंत, ज्या नेत्यांना ऐकायला लोकांना आवडतं त्यांना पुढे आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर सक्षम नेतृत्वाचीही गरज आहे, जे त्यांच्या गोष्टी मोठ्या हुशारीने लोकांसमोर ठेवतील असं कपिल सिब्बल म्हणाले.
कॉंग्रेस कमकुवत झालीय हे मान्य करावं लागेल.
बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच गुजरात आणि मध्य प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या निराशाजनक कामगिरीबद्दल सिब्बल म्हणाले, "ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाला पर्याय आहे, तेथेही लोकांना काँग्रेसबद्दल जितका हवा तितका विश्वास नाही. काँग्रेस कमकुवत झाली आहे हे पक्षाला मान्य करावं लागेल असंही सिब्बल म्हणाले.