पटना – बिहार निवडणुकीच्या निकालात जेडीयू आणि भाजपाप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राजभवनात दुपारी ४.३० वाजता शपथविधी सोहळ्याचं आयोजनाची खास तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र बिहारमधील विरोध पक्ष आरजेडी या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहे.
आरजेडी सूत्रांच्या माहितीनुसार बिहारच्या निवडणुकीत जनतेने नितीश कुमार यांच्याविरोधात जनादेश दिला आहे. आरजेडी जनतेसोबत आहे. जनतेच्या आग्रहास्तव तेजस्वी यादव आणि त्यांच्या पक्षातील कोणीही नेता शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नाही. त्याचसोबत तेजस्वी यादव १५ जागांवर कायदेशीर लढाई करणार आहेत, ज्याठिकाणी खूप कमी फरकाने आरजेडीचा पराभव झाला आहे.
आरजेडीने ट्विट करून सांगितले आहे की, राष्ट्रीय जनता दल शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहे. निवडणुकीत जनतेने सरकार बदलण्यासाठी मतदान केले होते, जनादेशाला शासनादेशमध्ये बदलण्यात आले. बिहारच्या बेरोजगार, शेतकरी, कर्मचारी आणि शिक्षकांची अवस्था काय झाली, त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं हे विचारावं. एनडीएच्या फसवणुकीमुळे जनतेत आक्रोश आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि जनतेसोबत कायम राहू असं त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नितीश कुमार आज संध्याकाळी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. बिहारचे राज्यपाल फागू चौहान नितीश कुमारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. उपमुख्यमंत्री म्हणून सुशील मोदी यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपाकडून विधीमंडळ गटनेतेपदी किशोर प्रसाद आणि उपनेतेपदी मंजू देवी यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं आहे.
नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.
महाआघाडीत वादाची ठिणगी
महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती असं आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे अशी नाराजी काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा यांनी शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली.