अरबपती कर्जबुडवे फरार, शेतकरी मात्र तुरुंगात- राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 03:43 AM2019-04-27T03:43:12+5:302019-04-27T03:44:01+5:30
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार
संगमनेर (अहमदनगर) : कर्जबुडवे अरबपती उद्योगपती फरार झाले आहेत आणि शेतकऱ्यांना २० हजार रुपयांसाठी तुरुंगात टाकले जात आहे़ मात्र, काँगे्रस सत्तेत आल्यास थकबाकीदार शेतकºयाला अटक करता येणार नाही, असा कायदा करणार आहे़ तसेच शेतकºयांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पही मांडणार आहे, असे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे सांगितले.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी रात्री त्यांची सभा झाली. काँगे्रसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ उपस्थित होते.
राहुल यांनी मोदी सरकारच्या आश्वासनांचे वाभाडे काढले़ ते म्हणाले, मोदी यांनी २ कोटी रोजगार देण्याचे, शेतमालास दुप्पट भाव, १५ लाख देण्याचे आश्वासन दिले होते़ प्रत्यक्षात हे काहीही झालेले नाही़ त्यांनी केवळ अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यावर कर्जांची खैरात केली़ मल्ल्या, चोक्सी, मोदी हे उद्योगपती कर्ज बुडवून परदेशात पळाले़ मोदींनी उद्योगपतींचे ५़५५ कोटींचे कर्ज माफ केले़ मात्र, गरिबांना काहीच दिले नाही़ अर्थव्यवस्थेला धक्का न लावताही काँगे्रस गरिबांच्या खात्यावर न्याय योजनेतून प्रत्येक महिन्याला ६ हजार रुपये व वर्षाला ७२ हजार रुपये देणार आहे़ यातून २५ कोटी लोकांना फायदा होणार आहे़ सध्या देशात २२ लाख सरकारी पदे रिक्त आहेत़ या सर्व नोकºया काँगे्रस सरकार तरुणांना देईल़ १० लाख तरुणांना पंचायतींत रोजगार मिळेल़ काँगे्रस सत्तेत आल्यास शेतकºयांसाठी स्वतंत्र बजेट तयार केले जाईल़ राफेल प्रकरणात मोदी हे फ्रान्सच्या कंपनीशी समांतर बोलणी करीत आहेत, असा ठपका हवाई दलाने ठेवलेला आहे़ ३० हजार कोटी रुपये मोदींनी राफेलमध्ये अनिल अंबानींना दिले आहेत़ यांचा कारभार सत्याचा कसा, असा प्रश्न त्यांनी केला़
राधाकृष्ण विखे यांचा गद्दार म्हणून उल्लेख
अशोक चव्हाण यांनी सभेत राधाकृष्ण विखे यांना गद्दार म्हणून संबोधले. विखे शुक्रवारी शिर्डीत सेनेच्या व्यासपीठावर होते. तो संदर्भ देत ते म्हणाले, जे आज सेनेच्या व्यासपीठावर आहेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तिकडे जावे.