नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस आणि इतर विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनाबाबत आलेल्या संसदीय समितीच्या अहवालावरून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या अनियोजित लॉकडाऊनमुळे लाखो लोकांना गरिबीत ढकलले गेले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले अशा शब्दांत राहुल यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 'खोटं बोलून कटू सत्य लपवण्याचा प्रयत्न' केला जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. "मोदी सरकारच्या अनियोजित लॉकडाऊनमुळे लाखो लोकांना गरिबीत ढकलले गेले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले आणि डिजिटल विभाजनामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी देखील तडजोड केली" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर याच अहवालाचा हवाला देत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
"आपल्या देशात आरोग्यावर अतिशय कमी खर्च"
आरोग्याशी संबंधित स्थायी संसदीय समितीने कोविड-19 महासाथीचा प्रकोप आणि प्रबंधनाबाबतच्या अहवालात 1.3 अब्ज इतकी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आरोग्यावर अतिशय कमी खर्च आहे आणि भारतीय आरोग्य व्यवस्थेच्या या नाजुकपणामुळे कोरोना महासाथीचा प्रभावीपणे मुकाबला करण्यात अडचणी आल्या असं नमूद केले आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांमध्ये असलेल्या खाटांची कमतरता आणि महासाथीच्या उपचारासाठी विशिष्ट दिशानिर्देशांच्या अभावामुळे खासगी रुग्णालयांनी अव्वाच्यासव्वा पैसे उकळले. या बरोबरच निश्चित किंमत प्रक्रियेद्वारे अनेक मृत्यू टाळता आले असते, असं देखील समितीने म्हटलं आहे.
"सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीत गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता"
समितीचे अध्यक्ष रामगोपाल यादव यांनी हा अहवाल शनिवारी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना सोपवला होता. सरकारद्वारे कोरोनाचा सामना करण्यासाठी सादर करण्यात आलेला हा कोणत्याही समितीचा पहिलाच अहवाल आहे. सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीत आपली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता असल्याचेही समितीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशाच्या आर्थिक स्थितीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.
"देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी, मोदींच्या धोरणांमुळे भारताची ताकद झाली कमकुवत"
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळेच भारत मंदीच्या फेऱ्यात अडकला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल यांनी याबाबत ट्विट केलं होतं. "देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी आली आहे. मोदींच्या धोरणांमुळे भारताची ताकद कमकुवत झाली आहे" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. तसेच याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचा संदर्भही राहुल यांनी दिला. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दर (जीडीपी) उणे 23.9 टक्क्यांनी खाली आला होता. याआधी राहुल गांधी यांनी नोटाबंदी, लॉकडाऊन आणि सरकारच्या आर्थिक निर्णयांवर हल्लाबोल केला होता.