- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर विधिमंडळ पक्षात फूट पडते की काय, अशी भीती गुजरातकाँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. काँग्रेसने जितीन प्रसाद यांना पक्षाने पश्चिम बंगालचे प्रभारी केले होते; परंतु पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. ‘काँग्रेसच्या चिन्हावर आपण जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर निवडणुकीच्या तोंडावर आमदार पक्ष सोडून जात आहेत,’ असे गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले. आम आदमी पक्ष, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिन आणि छोटूभाई वसाव यांचा भारतीय ट्रायबल पक्ष निवडणुकीत काँग्रेसला असलेल्या पायाची हानी करू शकतात.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते परेश धनानी यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘भाजप हा विरोधी पक्षांत फूट पाडण्यासाठी प्रसिद्ध आहे. अशा मार्गांनी त्याने विधानसभेत आपले आमदार वाढविले.’ असे लोक बाहेर निघून गेल्यावर पक्ष स्वच्छ होईल, असे धनानी यांना वाटते.
राज्याकडे दुर्लक्ष केलेपुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक होत आहे. राज्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या व्यवस्थापकांवर केला आहे. आमच्याकडे व्यूहरचना, नियोजन, संसाधने नाहीत व कार्यकर्तेही. आमचे काही नेते, कार्यकर्ते ‘आप’कडे पाठवीत आहेत, असेही ते म्हणाले.