पुणे – विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगणार आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून संग्राम देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा. एन. डी चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून अरूण लाड यांना अधिकृत उमेदवारी घोषित झालेली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या भैय्या माने यांनीही निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे भैय्या माने अर्ज मागे घेणार की राष्ट्रवादीला पुन्हा बंडखोरीचा फटका बसणार हे आगामी काळात ठरेल, तुर्तास सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या उमेदवाराने अर्ज भरल्याने भाजपा खोत यांची समजूत काढणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोण आहेत प्रा. एन. डी. चौगुले?
प्रा. एन.डी चौगुले हे कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यात विस्तारलेल्या सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी कोतोली ता पन्हाळा या संस्थेचे अध्यक्ष असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम करत आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे आकर्षित झाले. परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरपूर काम केले . अनेक वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा गाजविल्या . पुढे इंग्रजी विषयातून एम ए बीएड या पदव्या संपादन केल्या आणि ते शिक्षक बनले. शिक्षण क्षेत्रातील उमेदवारीच्या काळामध्ये त्यांनी अनेक विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून इमानेइतबारे नोकरी केली. एक शिक्षक ते संस्थाचालक असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते, पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यानिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखली होती, यात विशेषत: अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.