नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजन केले. मात्र यावरून आता ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहे. आदिवासी कुटुंबासोबत शहा यांनी केलेलं भोजन म्हणजे फक्त दिखावा असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी "बांकुडा जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या घरी अमित शहा यांनी केलेलं भोजन हा फक्त दिखावा होता. अमित शहा यांच्यासाठी तयार करण्यात आलेलं जेवण हे फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवण्यात आलं होतं" असा दावा केला आहे. तसेच शहा यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याऐवजी दुसऱ्याच पुतळ्याला हार घातला. नंतर हा पुतळा एका शिकाऱ्याचे असल्याचे समोर आलं होतं अशी आठवण देखील ममतांनी स्थानिकांना करुन दिली आहे.
जमीनवर पंगतीमध्ये बसून जेवत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
काही दिवसांपूर्वी अमित शहा बांकुडामध्ये पोहचले होते. तेव्हा त्यांनी आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केलं. जमीनवर पंगतीमध्ये बसून जेवत असल्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. शहा यांनी केळीच्या पानावर शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला. तेव्हा त्यांच्यासोबत पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय तसेच प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
"अमित शहा यांनी बासमती भात, पोस्टा बोरा खाल्लं"
ममता बॅनर्जी यांनी हा भोजनाचा कार्यक्रम दिखावा असल्याचम म्हटलं आहे. तसेच या भोजन समारंभाआधी आदिवासी कुटुंब जेवणाची तयारी करत असतानाचे काही फोटो देखील समोर आले होते. यामध्ये त्या कुटुंबातल सदस्य हे भाजी कापताना पाहायला मिळाले. मात्र त्या गोष्टींचा वापर हा खरंतर जेवणात करण्यात आलाच नाही. अमित शहा यांनी बासमती भात, पोस्टा बोरा खाल्लं असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच आम्ही बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारणार असून बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त पुढच्या वर्षीपासून सुट्टी घोषित करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.