"नवाब मलिकांनी कव्हर फायरिंग केलंय; राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात शंकाच नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 11:43 AM2021-08-04T11:43:17+5:302021-08-04T11:47:20+5:30
शरद पवारांच्या भेटीगाठी; आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि नंतर अमित शहांची घेतली भेट
मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल केला. एकीकडे राहुल गांधी आणि संजय राऊत यांची भेट होत असताना दुसऱ्या बाजूला पवार-शहांची भेट झाली. या घटनाक्रमावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे. राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार असल्याचं भाकीत दमानियांनी ट्विटमधून केलं आहे.
राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 3, 2021
जस मिलिटरी attack / retreat करतांना Cover fire देतात तोच प्रकार आपण आज पहिला
नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार- शाह भेटीला एक cover up करण्यासाठी होता. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजप विरुद्धच आहोत
राज्यपाल भवनाच्या माध्यमातून समांतर सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काल मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत दमानियांनी एक ट्विट केलं आहे. 'जसं मिलिटरी अटॅक/रिट्रिट करताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार- शाह भेटीला एक कव्हर अप करण्यासाठी होता. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजप विरुद्धच आहोत. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही,' असं दमानियांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
15 जुलै फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?)
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) July 17, 2021
16 जुलै फडणवीस दिल्ली ला जातात
17 जुलै शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात.
महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही
काल अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. त्याआधी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. त्याच्या एक दिवस आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. या घटनाक्रमाबद्दलही दमानियांनी ट्विट केलं आहे. दमानियांनी केलेल्या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चेला दमानियांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे.