मुंबईः भाजपाकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये दाखल झालेले रणजितसिंह मोहिते-पाटलांना डावलण्यात आल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रणजितसिंह मोहिते-पाटलांचे वडील विजयसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस या तालुक्यांसह पंढरपूर तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील उत्तर-पूर्व भागांचा समावेश आहे. या उत्तर-पूर्व भागांतच रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मोठा जनाधार आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची आता चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार आणि माढ्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपानं काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं.
याआधी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. रणजितसिंह यांच्या पक्षप्रवेशावेळी मोहिते-पाटील कुटुंबाचा मान राखला जाईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले होते. विशेष म्हणजे भाजपाबरोबर असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची वाट धरून उमेदवारी मिळवली. त्यामुळे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा संजय शिंदेंशी थेट सामना होणार आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे पुत्र आहेत.