"स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार?"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:29 PM2020-12-16T14:29:18+5:302020-12-16T14:32:58+5:30
BJP Ashish Shelar And Thackeray Government : भाजपाने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई - मुंबईमेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे आदेश मुंबई हायकोर्टाने एमएमआरडीएला दिले आहेत. सध्या या भूखंडावरील काम जैसे थे ठेवावे असे हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, असे हायकोर्टाने सांगितले. यावरून भाजपाने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
"स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार?" असा सवाल भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं असून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. "आरेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत. त्यानंतर कांजुरमार्ग मेट्रो कारशेड बाबत स्वतःच नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मान्य नाही. आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तरी मान्य करणार का? स्वतःच्या अहंकारातून अजून मुंबईकरांचे किती नुकसान करणार? अहंकार! अहंकार आणि अहंकार!!" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
आरेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 16, 2020
त्यानंतर कांजुरमार्ग मेट्रो कारशेड बाबत स्वतःच नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मान्य नाही.
आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तरी मान्य करणार का?
स्वतःच्या अहंकारातून अजून मुंबईकरांचे किती नुकसान करणार?
अहंकार! अहंकार आणि अहंकार!!
विकासकामांमध्ये राजकारण करणे योग्य ठरणार नाही. याबाबत कायदे आणि नियमांच्या माध्यमातून काय पावले उचलता येतील, याचा निर्णय राज्याचे प्रमुख आणि महाविकास आघाडी सरकार घेणार आहे. कुठल्याही न्यायालयाच्या निर्णयाबाबत दाद मागण्याची तरतूद असते. त्यामुळे आम्ही या निर्णयाविरोधात दाद मागू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडवरून उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर भूखंडावर राज्य सरकारच्या मालकीबाबत उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘ही जागा केंद्र सरकारच्या मालकीची असल्याचे अनेक कागदपत्रांद्वारे सिद्ध होते. ही जागा केंद्र सरकारच्या मालकीची आहे, हे एमएमआरडीएनेही मान्य केले आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.
डिसेंबर २०१९ मध्ये नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी वाणिज्य मंत्र्यांना पत्र लिहून कांजूरमार्ग येथील जागा राज्य सरकारला देण्याची विनंती केली होती,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.तसेच एमएमआरडीएनेही केंद्र सरकारकडून १०२ एकर भूखंड बाजारभावाने खरेदी करण्याची तयारीही दर्शविली होती. यावरून ही जागा केंद्र सरकारची असल्याचे आढळते. या सर्वांनी ही जागा केंद्र सरकारची असल्याचे मान्य केले आहे, असे कोर्टाने म्हटले होते.
"महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आलीय", भाजपा नेत्याचा हल्लाबोलhttps://t.co/DlXsSHIAZS#BJP#AtulBhatkhalkar#ThackerayGovernment#UddhavThackeraypic.twitter.com/q3P9cMArE3
— Lokmat (@MiLOKMAT) December 13, 2020