मुंबई - कांजूरमार्ग येथे होऊ घातलेल्या मुंबईमेट्रोच्या कारशेडवरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. याच दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा" असं म्हणत आशिष शेलारांनी निशाणा साधला आहे. तसेच वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला आहे. मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा देऊन बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
"मेट्रोला गिरगावमध्ये विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर इतकंच नव्हे तर मुंबई- दिल्ली कॉरिडॉर. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच. आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा देऊन बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय" असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे. याआधीही अनेकदा शेलारांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
"मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे, वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला हे विरोधक नव्हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक आहेत" असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना शेलारांनी सणसणीत टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबई मेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे आदेश मुंबई हायकोर्टाने एमएमआरडीएला दिले. सध्या या भूखंडावरील काम जैसे थे ठेवावे असे हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, असे हायकोर्टाने सांगितले आहे.