मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्वीटवरून मिळत आहे. याच दरम्यान भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. "दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे" असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच...त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या... दुर्दैवाने ऐवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे!" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास NIA कडून सुरु आहे, यातच NIA ने स्कॉर्पिओ, इनोव्हापाठोपाठ आता सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कारही जप्त केली आहे. या कारच्या डिक्कीतून 5 लाख रुपयांची रोकड आणि नोटा मोजायची मशीन सापडल्याने खळबळ उडाली. मात्र आता या कारवरून काँग्रेस आणि भाजपात जुंपल्याचं दिसून येत आहे
“सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी नाना पटोले अन् सचिन सावंत यांनीच मदत केली”
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जप्त केलेल्या मर्सिडीजसोबत भाजपा नेत्याचे फोटो असल्याचं ट्विट केलं होतं, त्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत सचिन वाझेंना ती कार घेण्यासाठी नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच मदत केल्याची माहिती आमच्याकडे आली आहे. त्यामुळे चौकशी स्वत:कडे येते की काय या भीतीन काँग्रेसचे नेते भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, यातील सत्यता तपास यंत्रणांनी पुढे आणावी अशी मागणी शेलारांनी केली आहे.
ठाकरे सरकारची हेराफेरी
ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. पूजा चव्हाणप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी सरकारवर केला आहे.
"महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करतंय"; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही या प्रकरणात उडी घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमृता फडणवीस यांनी सचिन वाझे अटक प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे असा गंभीर आरोप देखील अमृता यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एकीकडे नागपूरसारख्या शहरामध्य कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी सरकार आपल्या काही खास पंटराकडून योजना आखत आहे" असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.