मुंबई – अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेकडून निधी गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकारणाला वेग आला आहे. भाजपाकडून मुंबईत वार्डावार्डात कार्यकर्त्यांकडून पैसे गोळा करण्याचं काम सुरू आहे. यातच मालाडच्या मालवणी परिसरात राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
याबाबत भाजपाचे आशिष शेलार यांनी स्थानिक आमदार आणि मंत्री अस्लम शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटरमध्ये म्हटलंय की, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मालवणी मतदारसंघात काही दिवसांपूर्वी हिंदू, दलित कुटुंबावर घर सोडण्यासाठी दबाव आणला गेला, आता राम जन्मभूमीचे पोस्टर फाडले, पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचसोबत प्रभू रामाचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येत उभं राहणार, जनतेच्या सहभागातून, समर्पणातून ते उभे राहणार आहे. मुंबईतील मालवणीतूनही मोठ्या प्रमाणावर निधी संकलित होणार, पाहू कोण रोखतं, जय श्रीराम असं सांगत भाजपा नेते आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षपणे अस्लम शेख यांना इशारा दिला आहे.
देणगी जमा करणाऱ्यांवर भाजपाचाच दगडफेक करू शकते
आगामी निवडणुकीत फायद्याच्या दृष्टीने, उत्तर प्रदेशात राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्या लोकांवर भाजप दगडफेक करू शकते असा आरोप समाजवादी पार्टीचे समाजवादी पार्टीचे खासदार एसटी हसन यांनी केला आहे. सपा खासदाराने भाजपावर राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर भाजप उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम यांच्यातील सौहार्द नष्ट करून निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही मुसलमानही भाजपसोबत सामील होऊ शकतात, राम मंदिराचा मुद्दा संपला आहे. मात्र, भाजपाचे लोक देणगीसाठी जेव्हा बाहेर येतील, तेव्हा काही मुस्लीम लोक त्यांच्यावर दगडफेक करतील. आपण बघितले आहे, की मध्य प्रदेशात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर काय झाले. यातून हिंदूंनाही मेसेज दिला जाईल, की तेही असे करू शकतात असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
अनेकांनी दिल्या राम मंदिरासाठी देणग्या
गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिर उभारणीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांचे दान केल्याची माहिती मिळाली आहे. राम मंदिर उभारणीसाठी ११ कोटी रुपयांचे दान देणाऱ्या हिरे व्यापाऱ्याचे नाव गोविंदभाई ढोलकिया असे आहे. गुजरातमधील सूरत येथे असलेल्या रामकृष्ण डायमंड या कंपनीचे ते मालक आहेत. याशिवाय सूरतमधीलच व्यापारी महेश कबुतरवाला यांनी ५ कोटी, लवजी बादशाह यांनी एक कोटी रुपये राम मंदिरासाठी दान केले आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रहिवासी असलेल्या सुरेंद्र सिंह यांनी राम मंदिर उभारणीसाठी एक कोटी, ११ लाख, ११ हजार १११ रुपयांच्या देणगीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केला, अशी माहिती मिळाली आहे.
राम मंदिर उभारणीसाठी रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि आपल्या कुटुंबीयाच्या वतीने पाच लाख, १०० रुपयांची देणगी दिली. तर, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी पाच लाख, ११ हजार रुपयांची देणगी दिली. यासह अनेक राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही देणग्या देणार असल्याचं कळतंय. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देणगी गोळा करण्याची देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली. ही मोहीम २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, १३ कोटी देशवासीयांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.