मुंबई - कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. काँग्रेसच्या वतीने पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून 'शेती वाचवा' अभियान सुरू झाले आहे. या तीन दिवसीय अभियानाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत आहेत. काँग्रेसच्या या रॅलीत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. मात्र शेतकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात आली. यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
"काँग्रेससाठी खरे शेतकरी रॉबर्ट वाड्राच" असं म्हणत भातखळकर यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "राहुल गांधींच्या 'शेती वाचवा' आंदोलनात फक्त ट्रॅक्टर, सभांमधून शेतकरी मात्र गायब!.... खरा शेतकरी मोदी सरकारच्या नवीन शेती विषयक कायद्याचे फायदे पुरेपूर जाणतो... तो कशाला फिरकेल अशा बोगस आंदोलनाकडे?... काँग्रेससाठी खरा शेतकरी मात्र रॉबर्ट वाड्राच आहे..." असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
"राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार"
भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार" असं म्हणत निलेश यांनी निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट केलं आहे. "राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या 'शेती वाचवा' आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब!" असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
"राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात"
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील या आंदोलनावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत. ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात” असं इराणी यांनी म्हटलं आहे. नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसने पंजाबमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये राहुल गांधी यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह मोर्चामधील ट्रॅक्टरवर बसले होते. यावरुन आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. राहुल गांधी VIP शेतकरी आहेत. ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
"राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही"
कुरुक्षेत्रमध्ये ही रॅली थांबविण्यात येणार आहे. मात्र राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी घेतली आहे. रॅलीवरून हरयाणाचे माजी कृषिमंत्री आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष ओपी धनखड यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी यांना राज्यात ट्रॅक्टर रॅली घ्यायची असेल तर त्यांनी रॉबर्ट वड्रा यांनाही बरोबर आणावे, असे ओपी धनखड़ यांनी म्हटलं आहे.