मुंबई - पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवरुन भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्याबाबत पत्रकारांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारला होता. त्यावर 'भाजपाला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत' असं म्हणत टीकास्त्र सोडलं. पेडणेकर यांच्या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यावर पलटवार केला आहे. "कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो" अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "महापौर किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे" असं भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मालाडमधील मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या 15 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच, इमारतही खबरदारी म्हणून रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.
मुंबई उपनगरातील मालाड पश्चिम परिसरातील मालवणी भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 8 लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले. त्यांच्यावर कांदिवली परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपचार घेत असलेल्या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.