मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याच दरम्यान भाजपाच्या अनेक नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून दिसून येत होतं. राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी झालीय" असं म्हणत भाजपाने घणाघात केला आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना राठोडांवर निशाणा साधला आहे,
अतुल भातखळकर यांनी संजय राठोड यांना अटक करा अशी मागणी देखील केली आहे. "निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन दिसून येत होतं. संजय राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी झालीय. त्यांनी एकाही प्रश्नचं उत्तर दिलं नाही. फक्त समाजाच्या नावावर भावनिक शब्द बोलून ते निघून गेले. ऑडिओ क्लिपमधल्या आवाजावर ते बोललेले नाहीत. आईबाबांचं नाव घेऊन ते निघून गेले. राठोड यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे; भाजप नेत्याची बोचरी टीका
संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली झाली होती. तसंच घरातून निघाल्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफाही त्यांच्यासोबत होता. यावरून अतुल भातखळकर यांनी त्यांची तुलना गजा मारणेशी करत टोला लगावला. "संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत. तो गुंड होता हे मंत्री आहेत एवढाच फरक. समाजाला टाचेखाली चिरडणारी दबंग मानसिकता सारखीच आहे," असं म्हणत भातखळकर यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर हल्लाबोल केला. "जंगल मंत्री संजय राठोड पोहरा गडावर शक्तिप्रदर्शन करणार असतील तर संशयित गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने निरर्थक शक्ती कायद्याची टिमकी वाजवून नये. तसंच मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या जनतेला उपदेश करणारे रटाळ फेसबुक लाईव्ह कार्यक्रम करू नयेत," असंही ते म्हणाले.
"राज्यातील महिला मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही, संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा"
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अतुल भातखळकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली. तसेच या राज्यात महिला सुरक्षित तर नाहीत. पण राज्यातील महिला या मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही आहेत असं देखील याआधी म्हटलं होतं. "वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती, पोलीस अधिकारी असावेत"अशी मागणी भातखळकर यांनी केली होती.
सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न - प्रविण दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सुद्धा टीका केली आहे. "संजय राठोड यांनी फक्त मीडियासमोर येण्याचं नाटक केलं. समाजाचा दबाव निर्माण करुन त्यांनी प्रसारमाध्यमांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला. वाटलं होतं की ते प्रायश्चित्त घेतील. राजीनामा देतील आणि निर्दोषत्व सिद्ध करतील. पण सत्ताच आपल्याला यातून सोडवू शकत असल्याचं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नाही. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला कसा झाला?, याबाबत भाष्य केलं नाही. त्यांनी सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला" असं दरेकर यांनी म्हटलं आहे.