“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”
By प्रविण मरगळे | Published: January 15, 2021 09:32 AM2021-01-15T09:32:22+5:302021-01-15T10:24:40+5:30
दरम्यानच्या काळात मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या आरोपामुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष भाजपाकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार शरद पवार यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत, मुंडेंनी माझी भेट घेऊन मला सखोल आणि सविस्तर माहिती सांगितली आहे. ही माहिती पक्षाच्या बैठकीत नेत्यांना सांगितली जाईल त्यानंतर पक्ष म्हणून जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घेतला जाईल असं पवार म्हणाले. रात्री उशीरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत तर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नाही असं ठरलं आहे.
दरम्यानच्या काळात मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली, या धनंजय मुंडे प्रकरणावर चर्चा झाल्याचं कळतंय, त्यानंतर नांगरे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली आहे. मात्र आयपीएस अधिकाऱ्याच्या या भेटीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचसोबत राज्यात कोणतंही अधिकार पद नसलेल्या शरद पवारांशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे. तसेच पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी स्वत: सत्तेची सूत्रे हाती घ्यावी असा टोलाही आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांच्या सत्तास्थापनेवेळी धनंजय मुंडे यांची भूमिका संशयास्पद वाटत होती, मुंडे हे अजित पवार गटाचे मानले जातात. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवरून पक्षात तणाव निर्माण झाला होता. अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने दिले आहेत. मध्यंतरीच्या काळात भाजपा आणि मनसे नेत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेविरोधात ब्लॅकमेलिंगचे आरोप केल्याने संपूर्ण घटनेला वेगळेच वळण आले, त्यामुळे मुंडे यांच्या विरोधात असणारं वातावरण अचानक बाजूने बदलू लागले. कोणताही निर्णय घेण्याआधी संपूर्ण चौकशी होऊ द्या, वस्तुस्थिती समोर आल्यानंतर निर्णय घ्या, असे आपण पक्ष नेत्यांना सांगितल्याचे काही आमदारांनी स्पष्ट केले.
आमदार प्रतास सरनाईकांच्या पार्टीत हजर होत्या रेणू शर्मा
"मी पोलिसांत तक्रार केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडूनच जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप केले जाऊ लागले आहेत. मी कोणत्याही हनीट्रॅपचा भाग नव्हते. उलटपक्षी कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते, हेगडेंचे आरोप बोगस असल्याचं म्हटलं आहे. "कृष्णा हेगडे यांनी माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं तक्रारदार महिलेने सांगितले आहे.