लखनौ – उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाजपाची पिछेहाट होताना दिसत आहे. भाजपासाठी सर्वात महत्त्वाचं शहर अयोध्या आणि काशी(वाराणसी)मध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मथुरेत मायावती यांच्या बसपाने भाजपाला धोबीपछाड दिली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील पंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकांमध्ये विधानसभेची चाचणी म्हणून बघितलं जात होतं. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यासाठी निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांचे निकाल पूर्ण होण्यासाठी काही अवधी शिल्लक आहे.
सध्या ५ शहरांमधील निकालाचं चित्र काय आहे?
अयोध्या – प्रभू रामाचं भव्य मंदिरात उभं राहणाऱ्या अयोध्या नगरीत भाजपाला अतिशय वाईटरित्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी जिल्हा पंचायत समितीच्या ४० सदस्यांपैकी २४ जागांवर समाजवादी पक्षाने बाजी मारली आहे. तर भाजपाच्या खात्यात अवघ्या ६ जागा गेल्या आहेत. तर मायावती यांच्या बसपानं ५ जागा जिंकल्या आहेत.
वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात ४० जागांपैकी केवळ ८ जागांवर भाजपाला यश मिळालं आहे. तर १४ जागा जिंकून समाजवादी पक्ष अव्वल ठरला आहे. तसेच अपक्ष १, अपना दल १, बसपा १ आणि अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला १ जागा मिळाली आहे. उर्वरित जागांवर मतमोजणी सुरू आहे.
मथुरा – जिल्हा परिषदेच्या एकूण ३३ जागा आहेत. इथं बसपाने १३ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. तर भाजपाच्या खात्यात ८ आणि समाजवादी पक्षाच्या खात्यात १ जागा मिळाली आहे. राष्ट्रीय लोकदलाचे ८ आणि अपक्ष ३ उमेदवार जिंकले आहेत. तर काँग्रेसचा सूपडा साफ झाला आहे.
लखनौ – केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या मतदारसंघात २५ जागांचे निकाल आले आहेत. यात भाजपाला ३, सपा १० आणि बसपा ४ आणि इतरांना ८ जागांवर यश मिळालं आहे.
गोरखपूर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात ६८ पैकी केवळ २० जागा भाजपाला तर समाजवादी पक्षाला १९ जागांवर यश मिळालं आहे. आतापर्यंत ६५ जिल्हा पंचायत जागांचे निकाल समोर आले आहेत. यात सर्वाधित २१ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. तर बसपा २, काँग्रेस, आप आणि निषाद पक्ष प्रत्येकी १ जागांवर जिंकला आहे. ३ वार्डाचे निकाल येणे बाकी आहे.