मुंबई - राज्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला, धनंजय मुंडेवरील आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. या आरोपावर खुद्द मंत्री महोदयांनी जाहीर खुलासा केला. महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग आणि खोटे आहेत असं धनंजय मुंडे यांनी सांगितले. इतकचं नाही तर करूण शर्मा नावाच्या महिलेसोबत मी परस्पर संबंध ठेवले होते, त्यातून मला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी असल्याचं त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात मागील २४ तासांपासून कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या भाजपा नेत्यांनी अखेर पत्रक काढत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे प्रकरणात भाजपा नेत्यांचे मौन का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती, किरीट सोमय्या वगळता इतर कोणत्याही नेत्याने यावर भाष्य करणं टाळलं होतं. भाजपाच्या महिला आघाडीच्या उमा खापरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते यांनी याबाबत काहीही विधान केले नव्हते.
अखेर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटलंय की, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती असं ते म्हणाले.
तसेच आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत, ज्या व्यक्तीवर अशाप्रकारे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो, मात्र गेंड्याचे कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, तरीही धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
२०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.
या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.