भाजपाने डाव्यांचा गड फोडला; थिरुवनंतपुरममध्ये महापौरपदाचा उमेदवार पाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 03:23 PM2020-12-16T15:23:54+5:302020-12-16T15:26:57+5:30
Kerala Local Body Election Result News: केरळमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल आहे. यामध्ये सत्ताधारी सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफ आघाडीवर असून यूडीएफ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बिहार, हैदराबादमध्ये भाजपाने मुसंडी मारत अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असताना आता डाव्यांच्या भक्कम गडामधील अनेकवर्षांपासूनची कोंडी फोडली आहे. केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन पालिका भाजपाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल आहे. यामध्ये सत्ताधारी सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफ आघाडीवर असून यूडीएफ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, भाजपाने गेल्या वेळच्या तुलनेत मोठी झेप घेतली असून चांगले प्रदर्शन केले आहे. त्रिवेंद्रम आणि थिरुवनंतपुरममध्ये भाजपाने एलडीएफ आणि यूडीएफच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
केरळमध्ये ९४१ ग्राम पंचायतींमध्ये निवडणूक होती. यापैकी एलडीएफ 503 वर पुढे आहे. तर यूडीएफ 377 आणि भाजपा २४ ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहे. भाजपाकडून आमदारकीची निवडणूक लढलेल्या राजेश यांना या निवडणुकीत उतरवून भगवा दलाने मोठा डाव खेळला होता. राजेश नेडुमंगड मतदारसंघातून विधानसभा लढले होते. तेव्हा ते तिसऱ्या क्रमांकावर होते.
एनडीएने महापौर पदाच्या उमेदवाराला पाडले
थिरुवनंतपुरम आणि कोझिकोड कार्पोरेशनमध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये भाजपाने थिरुवनंतपुरममध्ये दोन्ही विरोधी पक्षांना हैरान करून सोडले होते. १०० सीटपैकी भाजपाला ३४ जागा मिळाल्या होत्या. यूडीएफ तिसऱ्या क्रमांकावर गेली होती. यावेळीही भाजपाने कडवी टक्कर दिली आहे. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएने डाव्यांचा महापौर पदाच्या उमेदवार एस पुष्पलता यांनाच पराभवाची धूळ चारली आहे.
थिरुवनंतपुरम केरळमध्ये घुसण्याचा दरवाजा
लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या हिशोबाने थिरुवनंतपुरम महापालिका निवडणूक भाजपासाठी खूप महत्वाची आहे. भाजपासाठी केरळमध्ये घुसण्याचा हा दरवाजा आहे. १०० वॉर्ड चार विधानसभा मतदारसंघात विभागलेले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाने चारपैकी एक जागा जिंकली होती. १५ वर्षांपासून माकपाचे येथे राज्य आहे. यामुळे महापौर पदाचा उमेदवार पाडल्याने भाजपाला महापौरपद मिळेल का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यानंतर पलक्कडमध्येही भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे.