खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंग करुन भाजपवाले वर आले: अस्लम शेख
By मोरेश्वर येरम | Published: January 17, 2021 04:54 PM2021-01-17T16:54:14+5:302021-01-17T16:59:56+5:30
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला.
"खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंगकरुन भाजप पक्ष वर आला आहे", असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. ते नवी मुंबईत बोलत होते.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा आज मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात संबोधित करताना अस्लम शेख यांनी भाजपचा सडकून समाचार घेतला.
"खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅप करुन भाजप पक्ष वर आला आहे. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवसेनेसोबत इतकी वर्ष होती. ज्यांचं बोट धरुन तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात त्याच शिवसेनेला हे संपवायला निघाले होते. आता शिवसेना चांगलं काम करू लागली तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला", अशी टीका अस्लम शेख यांनी केली.
भाजपने केवळ खायचं काम केलं
नवी मुंबईतील विकास कामांवरुनही अस्लम शेख यांनी भाजपवर टीका केली. "गेल्या दहा-बारा वर्षात नवी मुंबईकरांसाठी काहीतरी करायची गरज होती. पण भाजपने केवळ खायचं काम केलं. आम्ही आश्वासन देतो. इथल्या भूमिपुत्रांसाठी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी नक्की निर्णय घेऊ. नवी मुंबईसाठी कसं बंदर विकसीत केलं जाईल यावर कॅबिनेट बैठकीत लवकरच निर्णय घेऊ", असं अस्लम शेख म्हणाले.