लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी संपली असून मंगळवारी मतदान पार पडले. दरम्यान, मतदानाच्या आदल्या रात्री भाजपच्या गारगाव गटातील उमेदवार करुणा वेखंडे आणि त्यांचे पती किशोर वेखंडे यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. या पाठिंबाने राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपची मात्र नाचक्की झाली.
वाडा तालुक्यातील गारगाव गटातून भाजपतर्फे करुणा वेखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व काँग्रेस अशी चौरंगी लढत होत असतानाच भाजप उमेदवार करुणा वेखंडे यांचे पती किशोर वेखंडे यांनी सोमवारी रात्री शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. या पाठिंब्याने मात्र भाजप चांगलाच अडचणीत आला आहे.
भाजपच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षावर नामुष्की ओढवली आहे. किशोर वेखंडे यांनी शिवसेना उमेदवार नीलम पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या चित्रफितीची चर्चा जोरदार सुरू आहे.