मुंबई - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी सहा वर्षांनंतर उठविण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी त्याबाबतचा निर्णय घेतला. दारूबंदीमुळे अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारी जिल्ह्यात बोकाळली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समर्थन राज्य शासनाने केले आहे. या निर्णयाला विरोध करणारे सूर लगेच उमटू लागले आहेत. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना त्यांच्या एका जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी, यवतमाळमधील दारूबंदीचं काय झालं? असं म्हणत चित्रा वाघ यांनी पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेचजयंत पाटलांच्या भाषणाचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. पाटील यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. "क्या हुवा तेरा वादा….जयंतरावजी. सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार…..इस आश्वासन का" सणसणीत टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. तसेच "यवतमाळ राहिलं दूर... चंद्रपूरची दारुबंदी उठवली तुमच्या सरकारने. महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल" असा इशाराही वाघ यांनी दिला आहे.
चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये विधानसभेत यवतमाळच्या दारूबंदीवर जयंत पाटील बोलताना दिसत आहेत. कालच मला स्वामिनी जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या काही भगिनी भेटल्या. त्यांची मागणी काय होती, यवतमाळमध्ये दारूबंदी करा. आम्ही मध्ये संघर्ष यात्रा केली. त्यावेळी त्या भेटल्या आणि म्हणाल्या दारूबंदी करा. मी त्यांना सांगितलेलं आहे, सुधीरभाऊ करतात की नाही ते बघा. नाही तर आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्याची दारुबंदी करू. हे आश्वासन मी त्यांना दिलं आहे, लिहून घ्या. चंद्रपूरला दारुबंदी होते, त्या महिलांचा साधा प्रश्न आहे की यवतमाळला का होत नाही? आणि सुधीरभाऊ राज्याचे अर्थमंत्री असताना दारुबंदी का होत नाही?" असा सवाल पाटील यांनी केला होता. त्याचीच आता आठवण करून देत चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री असताना 1 एप्रिल 2015 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली होती. दारूविक्री आणि दारू पिण्याचे परवाने रद्द केले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार सुरेश (बाळू) धानोरकर विशेष आग्रही होते. बंदीमुळे अवैध दारू, गुन्हेगारी तर बोकाळलीच शिवाय चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटनावर मोठा विपरीत परिणाम झाल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. महाविकास आघाडी सरकारने या दारूबंदीचा फेरविचार करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा यांची समिती नेमली होती. या समितीने 9 मार्च 2021 रोजी दिलेल्या अहवालाच्या आधारेच दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला.