मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याच दरम्यान भाजपाच्या अनेक नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं देखील म्हटलं आहे. यासोबतच "बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले. फक्त आपल्या खुर्च्या वाचवल्या आहेत, जनतेला काय उत्तर देणार?" असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांवर देखील निशाणा साधला आहे. "पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणात कुणीही पुणे पोलिसांच्या ताब्यात नाही. पोलिसांना कुणाचाही कॉल लॉग कसा मिळाला नाही?, पुणे पोलिसांकडून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायचं काम सुरू आहे" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच "बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले. महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्र्यांकडे न्यायाच्या आशेने बघत आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडची तत्काळ हकालपट्टी केली पाहीजे" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
"पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायचं काम सुरू"
चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रत्यक्षदर्शींच्या चौकशीचे काय झाले? मोबाईल, लॅपटॅापचे काय झाले, माहीत नाही. संजय राठोड हा आरोपी फरार असताना अहवाल दिलाच कसा? अशी विचारणा करत संजय राठोडच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्ण होऊ शकत नाही. आधी त्याची चौकशी करा. सर्व पुरावे समोर आले असतानाही आरोपी सापडत नाही, असे म्हणत, पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या. राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असे मला अजूनही वाटते. बंजारा समाज हा राठोड यांच्यासोबत नाही. मला अनेकांचे फोन येत आहेत, पुजाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी होत आहे, असेही वाघ म्हणाल्या.
आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही, चित्रा वाघ यांची राठोडांवर सडकून टीका
"सध्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला साजेसं नाही. परंतु आता या लोकांनी नुसत्या घोषणा बाजूला ठेवून संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्या. राठोडांनी समाजाला वेठीस धरलं. बंजारा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म नसतो," असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.
"सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. परंतु त्यांच्याच पक्षाच्या नेता आपलं वाईट कृत्य समाजाच्या मागे घालून झाकण्याचा प्रयत्न करत आहे. याबद्दल गर्दी जमवून असं कसं कोण करू शकतं याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. समाजाला वेठीस धरण्याच्या ट्रेंड आता राजकारणात सुरू होऊ लागला आहे. कितीही लोकं आली जोरात नारे दिले म्हणून तुम्ही खरे आहात असं होत नाही. बंजारा समाज धाडसी आहे. आम्हाला आदर आहे. परंतु तो आदर संजय राठोडांसाठी नाही. ते हत्यारे आहेत. आरोपींना कोणतीही जात नसते. जे अनुत्तरीत प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना द्यावीच लागतील. महिलांचा विषय हा राजकारणाचा विषय नाही," असंही वाघ म्हणाल्या.
"निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस, संजय राठोड यांना अटक करा", भाजपाचा हल्लाबोल
भाजपाच्या अनेक नेत्यांनी संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून दिसून येत होतं. राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी झालीय" असं म्हणत भाजपाने घणाघात केला आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना राठोडांवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी संजय राठोड यांना अटक करा अशी मागणी देखील केली आहे. "निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन दिसून येत होतं. संजय राठोड यांची आजची अवस्था म्हणजे सामनामधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी झालीय. त्यांनी एकाही प्रश्नचं उत्तर दिलं नाही. फक्त समाजाच्या नावावर भावनिक शब्द बोलून ते निघून गेले. ऑडिओ क्लिपमधल्या आवाजावर ते बोललेले नाहीत. आईबाबांचं नाव घेऊन ते निघून गेले. राठोड यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.