"जुने व्हिडीओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतेय", ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:56 PM2021-05-05T15:56:48+5:302021-05-05T15:59:39+5:30

TMC Mamata Banerjee Slams BJP : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या हिंसाचारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाष्य केलं आहे.

BJP is circulating about fake incidents through old videos says Mamata Banerjee | "जुने व्हिडीओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतेय", ममता बॅनर्जी कडाडल्या

"जुने व्हिडीओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतेय", ममता बॅनर्जी कडाडल्या

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विराजमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्यावरुन भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या हिंसाचारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाष्य केलं आहे. ममता य़ांनी भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. "जुने व्हिडीओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतेय" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

बंगाल ही एकता असलेली भूमी आहे असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. जिथे भाजपा जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भाजपा आता जुने व्हिडीओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या असून, यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे

"बंगालमधील हिंसाचारापासून बचाव करण्यासाठी 400 कार्यकर्ते आसाममध्ये आले", भाजपा नेत्याचा दावा

विधानसभा निवडणूकीनंतर झालेल्या हिंसाचारापासून आपला बचाव करण्यासाठी बंगालमधील भाजपाचे सुमारे 400 कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय आसाममध्ये आले आहेत असा दावा भाजपाच्या नेत्याने केला आहे. आसामचे मंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी 300 ते 400 कार्यकर्ते हिंसाचारानंतर आसाममध्ये आल्याचं म्हटलं आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून काही फोटो शेअर केले आहेत. "भाजपा बंगालचे 300 ते 400 कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय छळ आणि हिंसाचाराचा सामना केल्यावर आसाममधील धुबरी येथे निघून आले आहेत. आम्ही त्यांना निवारा आणि अन्न देत आहोत. दीदींनी लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेले कुरूप नृत्य थांबवायलाचं हवं! बंगाल यापेक्षा अधिक चांगल्यासाठी पात्र आहे" अशा शब्दात हेमंत बिस्वा शर्मा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसाच्या कोलकाता दौऱ्यावर असून, बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराबाबत दुःख व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. भाजपच्या पराभवानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा प्रथमच कोलकाता येथे पोहोचले. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वैचारिक लढाई लढण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे नड्डा यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: BJP is circulating about fake incidents through old videos says Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.