पुणे : पंतप्रधान झाल्यापासून तीन ते चार वेळेस नरेंद्र मोदी यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरात हजेरी लावली आहे. मात्र प्रत्यक्षात न येत डिजिटल माध्यमाद्वारेही ते जनतेशी आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. असाच एक संवाद 'मेरा बूथ सबसे मजबूत' या अभियानाच्या निमित्ताने २८ फेब्रुवारी रोजी देशभर झाला. मात्र त्यात पुण्याच्या भाजप नगरसेविकेच्या प्रश्नाने काही क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील निःशब्द झाल्याचे बघायला मिळाले.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी भाजपच्या निवडणूक स्ट्रॅटेजीचा महत्वाचा भाग असलेल्या बूथ जोडणी आणि व्यवस्थापन विषयावर कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, भाजप नगरसेवक आणि बूथ प्रमुख उपस्थित होते.
याच कार्यक्रमात भाजप नगरसेविका राणी भोसले यांनी मोदी यांना विचारले की, 'भाजप सरकारने विविध क्षेत्रात कामगिरी करताना वेगवेगळ्या स्तरातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. अशावेळी मतदारांपर्यंत पोचताना या सर्व योजना कशा लक्षात ठेवायच्या' ?त्यांचा हा प्रश्न ऐकून मोदी आनंद होतोय आणि वाईटही वाटतंय अशी संमिश्र प्रतिक्रिया दिला. पुढे बोलताना त्यांनी सरकारने इतक्या योजना राबवल्यात की लक्षात राहणे कठीण आहे हे मान्य केले, नव्हे भोसले यांचे म्हणणे प्रशंसात्मक अर्थाने घेतले. मात्र त्यानंतर ते म्हणाले की, तुम्ही नगरसेवक असताना योजना विसरलात तर लोकांपर्यंत कशा पोचवणार ? प्रश्नाला उत्तर देताना मात्र त्यांनी योजनांचा तक्ता करा किंवा अल्फाबेट्स किंवा मुळाक्षरांप्रमाणे ते लक्षात ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
या विषयावर राणी भोसले यांनी प्रतिक्रिया देताना लोकमतला सांगितले की, माझ्या प्रश्नावर मोदीजी काय उत्तर देतील हे माहिती नव्हते. मात्र एका नगरसेविकेच्या प्रश्नाला गांभीर्याने घेत त्यांनी त्यावर दिलेले उत्तर कायम स्मरणात राहणारे आहे. यातून त्यांच्या विनम्रतेची झलक पुन्हा एकदा बघायला मिळाली.