मुंबई: गेले वर्षभर कोरोना काळात रुग्णांसाठी काम करून घेऊन राज्य सरकारने आम्हाला फुटकी कवडीही दिली नाही. त्यामुळे आता बेमुदत संपातून माघार नाही, असा संताप राज्यभरातील आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जवळपास ७० हजार आशांनी राज्यव्यापी संप पुकारला असून, याचे गंभीर परिणाम ग्रामीण भागातील कोरोनाच्या कामावर होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे. (bjp criticises thackeray govt over asha workers strike)
कोरोनाच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या जीवशी न खेळता सरकारने त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे.
सरकार हात वर करत आहे
आशा सेविकांच्या कामाचे कौतुक करत मुख्यमंत्री एकीकडे आशा कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतात. मात्र केलेल्या कामाचा मोबदला देण्याची वेळ आली की सरकार हात वर करत आहे. राज्य सरकारकडून मागण्या मान्य करण्याची आश्वासने अनेकदा मिळाली आहेत. मात्र ही आश्वासने न पाळून सरकार आशा सेविकांची फसवणूक करत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांशी चर्चाही झाली. मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही माधव भांडारी यांनी केला आहे.
“उत्तर प्रदेशवासीयांची बदनामी थांबवा, सत्य बोला”; योगी आदित्यनाथांनी राहुल गांधींना सुनावले
संप पुकारण्याची वेळ येणे हे अतिशय दुर्दैवी
कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना सुद्धा आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना आपल्या मागण्यांसाठी संप पुकारण्याची वेळ येणे हे अतिशय दुर्दैवी आहे. कोरोना काळात या सेविका अतिशय उत्कृष्ट काम करीत आहेत. समाधानकारक मानधन, विम्याचे कवच अशा प्राथमिक मागण्या त्यांच्या आहेत. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना दिलासा द्यावा. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा संप लवकर मिटेल, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलावीत!, असे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.