मुंबई – भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय पातळीवर नियुक्त्या आज जाहीर केल्या. या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना संधी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या तावडेंना राष्ट्रीय पातळीवर पक्षाने जबाबदारी दिली आहे. त्याचसोबत विधानसभेत पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांनाही पक्षाने राष्ट्रीय पातळीवर स्थान दिलं आहे. मात्र या यादीत प्रामुख्याने एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने डच्चू दिल्याचं दिसून येते.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपानेएकनाथ खडसे यांचे तिकीट कापले, त्यामुळे खडसे नाराज होते, मात्र एकनाथ खडसेंना मोठी जबाबदारी मिळणार आहे असं सांगत भाजपा नेत्यांनी त्यांची नाराजी दूर केली, परंतु विधानसभा निवडणुका होऊन १ वर्ष झाला तरी एकनाथ खडसेंना पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही. अलीकडेच नाथाभाऊंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप लावले. मात्र घरातील धुणी रस्त्यावर धूत नाही असं सांगत फडणवीसांनी एकनाथ खडसेंच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं होतं.
त्यानंतर आता भाजपाने राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा केली, त्यात विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना स्थान दिलं परंतु एकनाथ खडसेंना डावललं, यावरुन भाजपाच्या पक्षनेतृत्वाने खडसेंना एकप्रकारे अप्रत्यक्षपणे इशाराच दिल्याचं दिसून येते. पक्षातील अंतर्गत कलहाविषयी जाहिरपणे भाष्य करणे, पक्षातील नेत्यांवर टीका-टीप्पणी करणे, माझ्याकडे पुरावे आहेत ते जाहीर केले तर सगळेच अडचणीत येतील अशातऱ्हेने दबावतंत्र वापरणं या गोष्टी पक्ष खपवून घेणार नाही हाच संदेश नेतृत्वाने एकनाथ खडसेंना या माध्यमातून दिलाय का? अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की...
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला गेला नाही, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग अॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का? असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता. तोच मुद्दा खडसेंनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीसांना मी मोठं केलं, पण...
देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले, हेदेखील एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. 'मी देवेंद्र फडणवीस यांना २००५-२००६ पासून पाहतोय. ते अभ्यासू आणि होतकरू असल्यानं त्यांना मी संधी दिली. अनेकदा विधानसभेत माझ्या ऐवजी त्यांना पुढे केलं. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं, ते पुढे जाऊन असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं,' अशा शब्दांत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. 'सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना चांगलं काम करत होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आला. त्यांनाच पुन्हा संधी दिली जावी, असं राज्य भाजपामधील अनेकांना वाटत होतं. त्यावेळी राजनाथ सिंह पक्षाचे अध्यक्ष होते. एकदा गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. देवेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस तुम्ही सिंह यांच्याकडे करा, असं मुंडे म्हणाले. गोपीनाथजी माझे नेते होते. मी त्यांचा सन्मान केला. राजनाथ यांना फोन करून मी देवेंद्र यांचं नाव सुचवलं आणि मग देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले,' अशा शब्दांत खडसेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, यात जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता, त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची चर्चा झाली, तेव्हा हा मोठा नेता दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द एकनाथ खडसे आहेत असंही बोललं गेलं, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास त्याचा स्थानिक राजकीय समीकरणावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न शरद पवारांनी बैठकीत केला होता असं सांगितले गेले, परंतु या बातमीत तथ्य नाही सांगत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशावर मौन बाळगलं होतं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा
“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”
“कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?”
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारच्या ‘या’ दोन योजनेचा लाभ मिळणार नाही? जाणून घ्या सत्य
मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्यानं अधिकाऱ्याचं निलंबन; प्रोटोकॉल मोडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई