मुंबई – राजकारणात कधीही कोणी मित्र नसतो किंवा कोणी कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं जातं, हे प्रखरतेने जाणवलं जेव्हा राज्याच्या राजकारणात कट्टर शत्रू एकत्र येत सत्तास्थापन केली, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सरकारला काही दिवसांत १ वर्ष पूर्ण होतील, इतकी वर्ष एकमेकांच्या समोर उभे असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना यांच्यात दिलजमाई झाली आहे, तिघांनी हातात हात घेत राज्यात सत्ता स्थापन केली.
खरंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा महायुती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी थेट लढत होती, राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपाचं सरकार येणार अशी खात्री असल्याने बरेच नेते आघाडीतून बाहेर पडले आणि शिवसेना-भाजपात सहभागी झाले होते, विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि निकालही लागले. भाजपाला १०५, शिवसेना-५६, राष्ट्रवादी -५४ आणि काँग्रेस ४४ अशा प्रमुख पक्षांना जागा मिळाल्या. भाजपा आणि शिवसेना युती सरकार स्थापन करणार हे निकालावरुन स्पष्ट झालं.
परंतु राज्यात वेगळीच राजकीय घडामोड पाहायला मिळाली, मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात बिनसलं, मागील ५ वर्ष सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपाविरोधात भूमिका घेतली होती, पण निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षात समझोता झाला आणि युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेल्या. निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली, ठरल्याप्रमाणे सरकारमध्ये समसमान जागा वाटप झालं पाहिजे अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली, तर मुख्यमंत्री पद सोडून मंत्रिपदावर समान वाटप होईल असं भाजपाने सांगितले, यामुळेच युतीत वादाची ठिणगी पडली.
मुख्यमंत्रिपदावरून दिलेला शब्द पाळावा असं शिवसेना नेते म्हणू लागले, निवडणुकीपूर्वी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, तेव्हा बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत वाटाघाटी झाली होती, या बैठकीत जे ठरलं आहे तेच भाजपाने पाळावं अशी मागणी शिवसेनेने केली, पण अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास भाजपाने नकार दिला. तेव्हा काळजी वाहू मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी दिवाळी स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं, यात अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्याचा कुठलाही शब्द शिवसेनेला दिलेला नाही, या देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यानं राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली होती.
गेल्या वर्षी आजच्याच दिवशी वर्षावर देवेंद्र फडणवीसांनी स्नेहभोजनावेळी ही भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा वाद विकोपाला गेला, शिवसेनेने भाजपाशी चर्चा न करण्याचं ठरवलं आणि थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली, त्यानंतर भाजपाने रातोरात अजित पवारांना हाताशी धरत पहाटे सत्तास्थापनेचा दावा केला, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली, ७० तासांनंतर अजित पवारांच्या राजीनाम्याने सरकार कोसळलं, त्यानंतर पुन्हा शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपद पटकावलं. कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी ते विधान केले नसते तर आज राज्यातील चित्र वेगळ पाहायला मिळालं असतं.