पुणे – आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा भगवा आणि आरपीआयचा निळा झेंडा महापालिकेवर फडकवायचा आहे. मला अलीकडच्या काळात भाजपाच्या भगव्याचा विशेष उल्लेख करावा लागतो. कारण भगव्याची शपथ घेणारे अशा लोकांसोबत आहेत ज्यांना भगव्याचा मान नाही, सन्मान नाही, ज्यांना स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते अशां लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. ते लोक रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात अशी बोचरी टीका भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर केली आहे.
पुण्यात भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्धाटन करण्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आले. त्यात २ शिवसेनेचे खासदार आहेत. तेव्हा संसदेत निलंबित सदस्यांना माफी मागण्यास सांगितले त्यांनी असं विधान केले की, आम्ही माफी मागायला सावरकर आहोत का? भ्रष्टाचाराच्या पैशातून ज्यांचे महाल पोसले गेले. ते सावरकारांचा अपमान करतात त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही सावकरवादी आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. होय आम्हाला गर्व आहे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करतो. भारत चोहीकडे प्रगती करतोय. कोविड काळात मोदींच्या नेतृत्वात भारतीय लस तयार झाल्या नसल्या तर काय अवस्था झाली असती? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.
मोदींच्या नेतृत्वात भारताने लस विकसित केली
अमेरिका, इंग्लंड, रशियासारख्या देशांनी आमचं लसीकरण झाल्याशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही मग तुम्ही जगला की मेला आम्हाला पर्वा नाही असं भारताला म्हटलं असतं. पण मोदींच्या नेतृत्वात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, वैज्ञानिकांना हिंमत देऊन हवी ती मदत देऊन भारतीय जनतेला मोफत लस उपलब्ध करुन दिली. महाराष्ट्र सरकारने १० कोटी जनतेला लस दिल्या त्या लसी केंद्र सरकारने दिल्या. मोदींच्या नावानं शंख फोडणारे हे लोक जनतेचा विश्वासघात करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम मोदींच्या नेतृत्वात सुरु झाले आहे. २०२२ मध्ये जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची असेल असं अनेक संस्थांनी सांगितले आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भ्रष्टाचारामुळे नोकरशाही संपुष्टात
महाराष्ट्रात वसुलीशिवाय काही सुरु नाही. नोकरशाही संपुष्टात येते. राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने महाराष्ट्रातील नोकरशाहीला पोखरुन टाकलं. सामान्य माणसांचा विचार करायला कोणी तयार नाही. पुणे महापालिकेला १ पैसा कोविड काळात राज्य सरकारने दिला नाही. कोविड काळात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत होते असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.