मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, पण प्रत्यक्षात शार्जिलबाबत महाविकास आघाडी सरकारने काय केले?" असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. तसेच अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार? असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले?" असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच "मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले. लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
"खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत. अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी" असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. एल्गार परिषदेमध्ये ‘हिंदू सडा हूआ है’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू धर्मियांच्या भावना शर्जिल उस्मानीने दुखावल्या होत्या. तरीही उस्मानीला आता हे महाविकासआघाडी सरकार आपल्या छायाछत्राखाली घेऊन विशेष वागणूक देत आहे अशी टीका करत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे, त्याचसोबत शर्जिल उस्मानीचे हे वक्तव्य गंभीर स्वरूपातील असूनही कठोर कलमाखाली का गुन्हा दाखल केला जात नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला
“हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणाऱ्या शर्जिल उस्मानीला राज्य सरकारचा आश्रय”
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. उपाध्ये म्हणाले की, सत्तेत आल्यापासून सर्व प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींना संरक्षण द्यायची हीच या सरकारची भूमिका राहिल्याचे वारंवार पाहायला मिळते आहे. त्यामुळेच तपासात सहकार्य केल्यास कठोर कारवाई करणार नाही असे स्पष्ट आश्वासन पुणे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात शर्जिल उस्मानीने दिले आहे. शर्जिल उस्मानीच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य सरकारने स्वतः हून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने उस्मानीवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची हिंमत दाखविली नाही असा आरोप त्यांनी केला.