मुंबई"देशात भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाहीय. भाजपची तानाशाही सुरू आहे. या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यायला हवं", अस आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
देशात विरोधीपक्षाची दुर्दशा झाल्याचं म्हणतं 'सामना'च्या अग्रलेखात आज काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. "देशात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता इतर विरोधी पक्ष संपूर्ण ताकदीने लढताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे बरोबरीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला देशात सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाची वाणवा आहे असं नाही. भाजपला आव्हान देण्यासाठी एकत्र येऊन मजबूत संघटना निर्माण करण्यात गरज आहे", असं राऊत म्हणाले.
ही विरोधी पक्षाचीच दुर्दशा, संजय राऊतांचा काँग्रेसवर बाण; राज्यात पडसाद उमटणार?
केंद्राकडून दुय्यम वागणुकीचा आरोप"राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकार चालविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. केंद्र सरकार पुरेशी मदत करत नाही. त्यामुळे मोदींना पराभूत करायचं असेल तर विरोधी पक्षांना एकत्र यावचं लागेल. अनेक पक्ष भाजपच्या विरोधात निवडणूक लढवून सत्तेत देखील आले आहेत किंवा विरोधी पक्षात मजबुतीनं उभे आहेत. अशा सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच भाजपला धडा शिकवता येईल", असं राऊत म्हणाले.