VIDEO: 'भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही; पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतो'
By कुणाल गवाणकर | Published: December 26, 2020 09:46 AM2020-12-26T09:46:50+5:302020-12-26T09:49:05+5:30
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा
जयपूर: भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप मुस्लिमांना निवडणुकीत उमेदवारी देत नाही. मात्र सरकारं पाडण्यासाठी त्यांचा वापर करते, अशा शब्दांत गेहलोत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. भाजपचे नेते जफर इस्लाम गेहलोत यांच्या निशाण्यावर होते. इस्लाम यांनी राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची मुस्लिमांबद्दलची भूमिका दुटप्पी असल्याची टीका गेहलोत यांनी केली. 'भाजपनं राज्यातलं काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. या कटात भाजप नेते जफर इस्लाम यांचा समावेश होता. भाजप निवडणुकीत मुस्लिमांना तिकीट देत नाही. पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतो,' असा आरोप गेहलोत यांनी केला.
#WATCH | BJP doesn't give a ticket to Muslims during elections, but they are being used to topple the government: Rajasthan CM Ashok Gehlot (25.12) pic.twitter.com/tF6QMfWBVa
— ANI (@ANI) December 25, 2020
उत्तर प्रदेशात ४०० अधिक विधानसभा मतदारसंघ आहेत. बिहारमध्ये २५० च्या आसपास मतदारसंघ आहेत. मात्र भाजप एकाही मुस्लिम व्यक्तीला तिकीट देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल अलिगढ मुस्लिम विद्यापीठात किती छान भाषण दिलं. पंतप्रधानांचं व्यक्तीमत्त्व किती उदारमतवादी आहे, ते किती मोठ्या मनाचे आहेत. पण बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत किती फरक आहे. निवडणुकीत भाजप मुस्लिम व्यक्तींना उमेदवारी देत नाही. पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर नक्की करतो, अशा शब्दांत गेहलोत यांनी भाजपवर शरसंधान साधलं.
मोदी सरकारनं आणलेले नवे कृषी कायदे आणि त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन यावरूनही गेहलोत यांनी टीकास्त्र सोडलं. 'शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. सध्या हिवाळा सुरू आहे. आपल्याला इथे जयपूरमध्ये घरातही थंडी जाणवते आणि तिथे हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही. कोणत्याही व्यक्तीनं इतकं असंवेदनशील असू नये,' असं गेहलोत म्हणाले.