BJP Latest News : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपाने कारवाई केली. पक्षाविरोधात बंड करणाऱ्या ८ नेत्यांना पक्षातून बाहेर करण्यात आले आहे. यात एक माजी मंत्री रणजीत चौटाला, माजी आमदार देवेंद्र कादयान यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. हे नेते उमेदवारी नाकारल्यानंतर बंड करत भाजपाच्या उमेदवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
भाजपाचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडौली यांनी ८ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, "अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. सहा वर्षांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे."
भाजपाने कोणत्या बंडखोर नेत्यांची केली हकालपट्टी?
मोहनलाल बडौली यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडवा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले संदीप गर्ग, असंध मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जिलेराम शर्मा, गन्नौरमधील देवेंद्र कादयान, सफीदोतून निवडणूक लढवत असलेले बच्चन सिंह आर्य, रानिया मतदारसंघातील उमेदवार रणजीत चौटाला, महम मतदारसंघातील राधा अहलावत, गुरुग्राम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवीन गोयल आणि हथीनमधील केहरसिंह रावत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपाने तिकीट कापले, अपक्ष भरला अर्ज
माजी मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेल्या रणजीत सिंह चौटाला यांचे भाजपाने तिकीट कापले. त्यांनी रनिया मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. असे सांगण्यात येते की, भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला होता, ज्यात रणजीत चौटाला यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण जास्त आढळून आले आणि त्यामुळे पक्षाने त्यांचे तिकीट कापले.
हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. हरियाणात एकाच टप्प्यात मतदान होणार असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. याच दिवशी जम्म आणि काश्मीर विधानसभेचाही निकाल जाहीर होणार आहे.