"सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली", पडळकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 12:32 PM2020-12-19T12:32:04+5:302020-12-19T12:39:30+5:30

BJP Gopichand Padalkar And Maha Vikas Aghadi : सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

BJP Gopichand Padalkar Slams Maha Vikas Aghadi Over Sonia Gandhi letter to CM | "सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली", पडळकरांचा हल्लाबोल

"सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली", पडळकरांचा हल्लाबोल

Next

मुंबई - महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या कल्याण योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतुद करावी अशी सूचना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या कल्याण योजनांविषयी काँग्रेसची जी भूमिका आहे, त्याची राज्यात अंमलबजावणी व्हावी, अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सोनिया गांधी यांनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली असं म्हणत पडळकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं असून व्हिडीओ पोस्ट केला आहे. "हे महाविकास आघाडीचं सरकार दलित,आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता  मा.सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे. आतातरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठी लाचारी नाकारून आपल्या समाज बांधवांसाठी न्याय मिळवून द्यावा" असं पडळकरांनी म्हटलं आहे. 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; दिला महत्त्वाचा सल्ला

अर्थसंकल्पात मागासवर्गीयांसाठी केलेली आर्थिक वित्तीय वर्षात त्यांच्यासाठीच खर्च करावा यासाठी कर्नाटकमध्ये काँगेस सत्तेत असताना कायदा केला होता. त्याचा तेथील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना फायदा होतो. तशीच पावले महाराष्ट्राने उचलावीत, असे सोनिया गांधी यांनी सुचविले आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी यूपीए सरकारने ठाम निर्णय घेतले होते. तसेच निर्णय महाआघाडी सरकारनेही घ्यावेत. 

सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांची भरती करावी. ही प्रक्रिया विशिष्ट मुदतीत पूर्ण केली जावी अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांमध्ये कौशल्यविकास घडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तत्काळ पावले उचलावीत. या वर्गासाठी असलेली वसतिगृहे, आश्रमशाळा या ठिकाणी उत्तम सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे गांधी यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांना सणसणीत पत्र; “ तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबऱ्या अन् चमचा म्हणू शकतो पण...”

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेषात ढोल वाजवत विधानभवनासमोर आंदोलन केलं होतं, यावरून सामना अग्रलेखात शिवसेनेनं गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेनं गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद पडळकर असा केला होता, यावरून गोपीचंद पडळकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र लिहून समाचार घेतला आहे. या पत्रात गोपीचंद पडळकर म्हणतात की, मी आपणांस खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे उद्वोधन देऊन लिहू शकलो असतो, आपल्या दैनिकात माझा उल्लेख फेकूचंद केला यापद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही, प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मुळात मी सामना वाचत नाही, परंतु सोशल मीडियामधून लेख पाहायला मिळाला, आपण जी अग्रलेखात मुक्ताफळे उधळली आहेत, ती मुद्दाम लोकांना कळावित म्हणून मी लिहित आहे, त्या अग्रलेखात असे लिहिले आहे की, महाराष्ट्रात हुकूमशाही वा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलताशांसह तुरुंगात टाकले असते. पण फेकूचंदांना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. मी अधिवेशनात धनगरी पेहराव करून गजी ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देश, मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खाशी मी नाळ तोडलेली नाही, माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही तर हजारवेळा येईन, ते स्वातंत्र्य आपण आपल्या सरकारने दिलेले नाही ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते, मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार, राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे, सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाजतरी कसा येणार असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

Web Title: BJP Gopichand Padalkar Slams Maha Vikas Aghadi Over Sonia Gandhi letter to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.