Kirit Somaiya BJP: भाजपाने माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृ्त्वाखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये किरीट सोमय्या यांचीही वर्णी लावण्यात आली होती. पण, सोमय्यांनी नाराजी व्यक्त करत त्या नियुक्तीला विरोध केला. त्यानंतर आता भाजपाकडून नवीन जबाबदारी किरीट सोमय्या यांच्यावर सोपवण्यात आली असून, त्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर सोमय्यांनी माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यस्तरीय व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे असून, राज्यातील अनेक नेत्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. याच समितीत किरीट सोमय्या यांच्यावर निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. ज्याला सोमय्यांनी विरोध केला.
किरीट सोमय्यांवर आता कोणती जबाबदारी?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दलची माहिती दिली. "भाजपा नेते, माजी खासदार डॉ. किरीट सोमय्याजी यांची राज्याच्या मतदाता विशेष संपर्क अभियान प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. किरीट सोमय्याजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!", असे बावनकुळे म्हणाले.
किरीट सोमय्या नव्या जबाबदारीबद्दल काय म्हणाले?
यापूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यात बदल करून आता त्यांच्यावर फक्त मुंबई महानगर प्रदेशातील विधानसभा मतदारसंघापुरतीच जबाबदारी देण्यात आली आहे. किरीट सोमय्यांनीही याबद्दल ट्वीट केले आहे.
"प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझी नियुक्ती एमएमआरडीए (मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भाईंदर, वसई विरार आणि पनवेल) मतदाता विशेष संपर्क अभियानाच्या प्रमुखपदी केली आहे", असे म्हणत सोमय्यांनी नियुक्तीचे पत्रही पोस्ट केले आहे.
विधानसभा निवडणूकप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर सोमय्यांनी पक्षाविरोधातील नाराजी बोलून दाखवली होती. "मला न विचारताच माझ्या नावाची घोषणा केली. हे मला अमान्य आहे. यासाठी अन्य कोणाची निवड करावी", असे सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर नवी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.