मुंबई – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवरायांच्या कन्येबद्दल ट्विटरवरून माहिती शेअर करताना त्याच खोटा इतिहास टाकल्याचा आरोप भाजपाने केला, त्यानंतर सचिन सावंत यांनी त्याबाबतचा पुरावा दाखवून भाजपाने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली, त्यामुळे तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली, त्यामुळे शिवरायांच्या कन्येवरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे.(Controversy on Chhatrapati Shivaji Maharaj Daughter Name Between BJP & Congress Sachin Sawant)
सचिन सावंत(Sachin Sawant) यांनी ट्विट केलंय की, भाजपाचा तोंड फाडणारा पुरावा हा पहा! सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या व एका पत्नीचे नाव ही तेच होते, भाजपाने शिवरायांचा अपमान केला, माझी बदनामी केली, अकलेचे तारे तोडल्याबद्दल भाजपाने तात्काळ माफी मागावी, शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं सांगत पुरावा म्हणून एका पुस्तकातील उल्लेख असलेला फोटो जोडला आहे. यात म्हटलंय की, संकवारबाईचाही शिवाजी महाराजांची मुलगी होय, सखवारबाई, सकवारबाई ही संकवारबाई या नावाचीच रूपे आहेत. शिवाजी महाराजांच्या एका पत्नीचे नावही सखवारबाई होते, त्यांचे माहेरचे घराणे गायकवाड होते असं त्यात दिसून येत आहे.
काय आहे वाद?
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते, त्यात म्हटलं होतं की, शिवरायांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू सासरी जात असताना शत्रू सैन्याने हल्ला केला, त्यावेळी त्यांना वाचवणाऱ्या वाल्हे गावच्या महार समाजातील मंडळींना त्यांनी भोसले हे नाव दिले. गावकुसाबाहेर राहणाऱ्या महार, मांग, घोर, चांभार व रामोशी यांना शिवरायांनी मानाचे स्थान दिले. सचिन सावंतांच्या या ट्विटवर आक्षेप घेत काँग्रेस आणि त्यांचा खोटा इतिहास हे काही नवीन नाही. महाराणी सकवारबाई या शिवरायांच्या पत्नी व सखुबाई या कन्या, मात्र सकवारबाईंना शिवरायांच्या कन्या लिहून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. काँग्रेसने स्वत:च्या खोट्या इतिहासाचे दाखले जरूर द्यावेत मात्र शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं म्हणत भाजपाने सचिन सावंतांवर टीका केली होती.