शेतकरी आंदोलनावरून आता संसदेत गदारोळ सुरु आहे. कृषी विधेयकांवर लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा न करताच विधेयके संमत करण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना दिल्ला वेढा घातलेला असतानाआता विरोधकही केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे 8 फेब्रुवारी, सोमवारी भाजपाने सर्व खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. (BJP issue Whip to Rajyasabha MP for Monday)
राज्यसभेमध्ये आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा संपली. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा होऊ शकली नाही. प्रश्नोत्तर काळात आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. कामकाज वारंवार तहकूब होत होते. सायंकाळी 4 आणि पुन्हा 6 वाजता कामकाज सुरु करण्यात आले. शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत होणारा विरोध पाहून वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृह मंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. यामध्ये सोमवारी कोणत्याही परिस्थितीत खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत सोमवारी शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांवर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.
तोमर काय म्हणाले...
नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.