मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर टीका केली असून, सरकार केवळ घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले, अशी टीका करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye criticized thackeray govt over obc reservation)
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याला ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका करण्यात येत आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले
राज्यातील आघाडी सरकारच्या अपयशामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ज्या जिल्हा परिषदांची केस होती तेथे आता पोटनिवडणूका लागल्या. विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले. प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होते. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
किती जागांवर आणि कधी होणार निवडणूक?
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या ५ जिल्हा परिषद, तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर २० जुलै २०२१ रोजी मतमोजणी होईल. तसेच धुळ्यात १५, नंदूरबारमध्ये ११,अकोल्यात १४, वाशिममध्ये १४ आणि नागपूरमध्ये १६ जिल्हापरिषद विभागात निवडणुका होणार आहेत. तर, धुळ्यात ३०, नंदूरबारमध्ये १४, अकोल्यात २८, वाशिममध्ये २७ आणि नागपूरमध्ये ३१ पंचायत समितीत निवडणुका होणार आहेत.