मुंबई - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही याची झळ बसली असून यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. गेल्या काही दिवसांपासून देशभरात विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यानंतर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. "मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र शरद पवार कधी लिहीणार?" असा सवाल आता विचारला आहे.
केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून. लॅाकडाऊनमध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे शरद पवार आता थेट लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात. महाराष्ट्रात कोकणात वादळ व अन्य भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले पण शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधी लिहितील?" असं उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहीणार? 12 बलुतेदारांना मदत मिळाली नाही त्याची विचारणा करणारे पत्र राज्यसरकारला पवार साहेब कधी लिहीणार?" असं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. उपाध्ये यांनी याआधी ट्विट करून लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेच होते, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी!.. सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझा घरखर्च, तुझं लाईटबिल तूच पाहा असा चिमटा त्यांनी सरकारला काढला होता.
तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारमालकांची काळजी घेतलीय, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकारमध्ये पोलिसात वाझे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे. सामान्य माणसा तूच तुझा वाली आहे असंही केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. राज्यात कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात लॉकडाऊन सदृश्य कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.