मुंबई:राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिवसेना भवनाच्या काही अंतरावरच पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी भाजपा आणि सेनेचे कार्यकर्ते भिडले. यावरून आता भाजपने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठेय, अशी विचारणा केली आहे. (bjp keshav upadhye slams shiv sena over clash at sena bhavan dadar mumbai)
शिवसेना भवनासमोर झालेल्या तुफान हाणामारीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल असून, शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर राजकारण तापू लागले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सत्तेपाई सत्व गमावले
महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदिराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले, अशी टीका केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली
या आंदोलनानंतर आंदोलक अटक होऊन गेल्यानंतर लपूनछपून, पोलिसांच्या आड राहून एका महिलेवर हल्ला करणे. यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवलेली आहे, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच ज्यावेळी सोनिया गांधी, रॉबर्ट वढेरा देव बनतात, त्यावेळी तेंडुलकर, साठे आणि आंबेडकर हे शिवसेनेचे दुष्मन होतात. हे या ठिकाणी दिसले आहे. त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. लपून पोलिसांच्या आड राहून हल्ले कसले करता? रणांगणात समोर या, भाजप तुम्हाला चारही मुंड्या चीत करायला तयार आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. शिवसेना भवनच्या बाहेर भाजपचे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.